सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘मागील पानावरून पुढे..’ असा अर्थसंकल्प अधिसभेने रविवारी मंजूर केला. विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०१५ – १६ साठीचा ६०५ कोटी रुपये खर्चाचा आणि १३९ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प अधिसभेने रविवारी मंजूर केला. गेली दोन वर्षे अर्थसंकल्पातील अनेक तरतुदी खर्च झालेल्या नसतानाही त्यासाठी यावर्षी पुन्हा नव्याने तरतुदी करण्यात आल्या आहेत. यावर्षीपासून विद्यार्थ्यांसाठी ‘पुणे विद्यापीठ प्रतिष्ठित अभ्यासवृत्ती’ सुरू करण्यात आली असून त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पातील तरतुदी खर्च होत नसल्याचे दिसत असूनही विविध योजनांसाठी मोठय़ा तरतुदी करून अर्थसंकल्प फुगवून तो तुटीचा करण्याची परंपरा पुणे विद्यापीठाने यावर्षीही राखली. विद्यापीठाचा ६०५ कोटी रुपये खर्चाचा आणि १३९ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प अधिसभेने मंजूर केला. गेल्यावर्षीपेक्षा ५० कोटी रुपयांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पात वाढ झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही योजनांसाठी फारशा नव्या तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत. गेल्या काही वर्षांपासून तरतुदी करूनही अद्याप योजना प्रत्यक्षात आलेल्या नाहीत किंवा पूर्ण झालेल्या नाहीत. या तरतुदी खर्च होत नसतानाही यावर्षी पुन्हा त्याच योजनांसाठी नव्याने तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून व्हच्र्युअल क्लासरुमसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. मात्र, ती खर्च झालेली नसतानाही यावर्षी पुन्हा नव्याने ५ कोटी रुपयांची तरतूद या योजनेसाठी करण्यात आली आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षी लोककला अभ्यास आणि संशोधन केंद्रासाठी २५ लाख रुपयांची आणि बहुभाषिक संशोधन केंद्रासाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उद्योजकता विकास केंद्रासाठी यावर्षी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
यावर्षी विद्यापीठातील बांधकाम व सुविधांसाठी ११२ कोटी ४४ लाख रुपये, विद्यार्थ्यांसाठी विविध सेवा-सुविधांसाठी ३ कोटी ७७ लाख रुपये, महाविद्यालये व मान्यता असलेल्या संस्थांच्या विकासासाठी २० कोटी ५५ लाख रुपये आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या योजनांसाठी १६ कोटी १८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या तरतुदी (रुपयांमध्ये)
सायन्स पार्क – १ कोटी २० लाख
विद्यापीठ इनोव्हेशन सेंटर – ३१ लाख
नाशिक उपकेंद्र – ४ कोटी ८५ लाख
नगर उपकेंद्र – ५ कोटी ८५ लाख
अभ्यासक्रम विकास केंद्र – २५ लाख
सुप्रतिष्ठित प्राध्यापक योजना – १ कोटी
गुणवत्ता सुधार कार्यक्रम – २३ कोटी ५० लाख
विविध शिष्यवृत्ती योजना – १३ कोटी ५ लाख
दूरशिक्षण सुरू होणार
विद्यापीठाचा बहि:स्थ अभ्यासक्रम बंद करून त्याऐवजी दूरशिक्षण सुरू करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी विद्यापीठाने घेतला. मात्र, त्याबाबत पुढे काहीच झाले नाही. मात्र, यावर्षी दूरशिक्षण अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने अर्थसंकल्पात तरतूद करून येत्या वर्षांपासून दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. यावर्षी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
गारपीटग्रस्त विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत
गारपीट झालेल्या भागांतील शेतकऱ्यांच्या मुलांना शुल्कात सवलत देण्यात यावी अशी मागणी अधिसभा सदस्यांनी विद्यापीठाकडे केली. त्यासाठी स्वतंत्र तरतदू करण्याची मागणीही करण्यात आली. या मागणीला तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.
बॅरिस्टर जयकरांचा पुतळा उभारण्याची मागणी
विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर बाबासाहेब जयकर यांचा पुतळा विद्यापीठाच्या आवारात उभारण्यात यावा आणि त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी, अशी मागणी सदस्य डॉ. गजानन एकबोटे यांनी विद्यापीठाकडे केली. या प्रस्तावाला सभेने तत्त्वत: मान्यता दिली असून व्यवस्थापन परिषदेत हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.