माण ग्रामपंचायतीत का गेलात? असा प्रश्न विचारत बिल्डरने पाठवलेल्या २० ते २५ जणांच्या टोळक्याने फ्लॅटधारकांना मारहाण केली. रॉबर्ट अनथोनी पॉल यांनी या प्रकरणात पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. हिंजवडी जवळच्या माण गावात असलेल्या शर्मा व्हिलेज नावाच्या वसाहतीत ही घटना घडली आहे. बिल्डर विनोद शर्माने गुंड पाठवून मारहाण केल्याचा आरोप या अभियंत्याने केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद शर्मा फ्लॅट धारकांकडून मेन्टेनन्सचे पैसे घेतो. मात्र वीज आणि पाणी या महत्त्वाच्या सुविधा पुरवत नाही. तसेच सीसी अर्थात कम्प्लिशन सर्टिफिकेटही त्याने दिलेले नाही. ९६ फ्लॅटच्या वसाहतीत ४५ फ्लॅटची विक्री झाली आहे. २०१६ पासून ३५ कुटुंबे या ठिकाणी वास्तव्य करत आहेत. तरीही सुविधा अपूर्णच आहेत. याची माहिती फ्लॅटधारकांनी माण ग्रामपंचायतीत जाऊन दिली. हेच कारण मनात ठेवून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर बिल्डरचा शोध घेण्यात येतो आहे. तसेच तिघाना अटक करण्यात आली असून तपास सुरु आहे.