जागा ताब्यात नसताना गृहप्रकल्पाची जाहिरात करुन फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या बांधकाम व्यावसायिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने शनिवारी दिले.
योगेश वसंत शेलार (वय ४२, रा. मार्केटयार्ड) आणि जयंत चंद्रकांत वायदंड (वय ३६, रा. सहकारनगर) अशी न्यायालयीन कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. विलास दादाराव घाडगे (वय ५७, रा. डहाणुकर कॉलनी, कोथरुड) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. शेलार आणि वायदंड यांनी डब्ल्यू. एस. डेव्हलपर्सतर्फे कोळवडी गावात सृष्टी ऑर्बिट हा गृहप्रकल्प बांधण्यात येणार असल्याची जाहिरात केली होती. या दोघांनी प्रत्यक्षात जागा ताब्यात नसताना गृहप्रकल्पाची जाहिरात दिली होती. घाडगे यांनी या गृहप्रकल्पात सदनिका घेण्यासाठी अकरा लाख रुपये शेलार आणि वायदंड यांना दिले होते. त्यांना सदनिका दिली नाही. त्यामुळे घाडगे यांनी फसवणुकीची तक्रार दिली होती. या दोघांनी आतापर्यंत एक कोटी नऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. या दोघांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र ओनरशिप अ‍ॅक्टनुसार ( मोफा) गुन्हा दाखल केला आहे. या दोघांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ए.के. पाचारणे यांनी केली. न्यायालयाने दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.