सरकारी धोरणांच्या विरोधात पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांनी एकजूट दाखवून मंगळवारी मोर्चा काढला आणि एक दिवस काम बंद ठेवले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
‘अच्छे दिन येणार’ म्हणत सरकार सत्तेवर आले असले तरी त्यांच्या धोरणांमुळे वाईट दिवस आले आहेत. सरकार म्हणजे रावणाच्या दहा तोंडांसारखे असून, त्याच्या प्रत्येक तोंडात बांधकाम व्यावसायिकाला नवेद्य टाकावा लागतो. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक वैतागले आहेत, अशी टीका पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांकडून भाजप सरकारवर करण्यात आली. या आंदोलनात क्रेडाई आणि मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना यांचे सुमारे पाचशे बांधकाम व्यावसायिक आणि त्यांचे कर्मचारी उपस्थित होते. त्यात क्रेडाईचे अध्यक्ष सतीश मगर, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष सुधीर दरोडे, डीएसके उद्योग समूहाचे डी. एस. कुलकर्णी, परांजपे बिल्डर्स, अमित डेव्हलपर्स, तसेच इतर अनेक नामवंत लहान-मोठे बांधकाम व्यावसायिकही सहभागी झाले होते.