पुण्यातील इंदापूर तालुक्यात माणुसकीला लाजवेल अशी धक्कादायक घटना घडली असून जेसीबीच्या सहाय्याने एका बैलाची हत्या करण्यात आली. बैल पिसाळला असल्या कारणाने त्याच्या अंगावरच जेसीबी चढवून हत्या करण्यात आल्याचा हा धक्कादायक प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात कैद करण्यात आला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता हा व्हिडीओ इंदापूरमधील असल्याचं समोर आलं होतं.

काय आहे प्रकरण ?
इंदापूर तालुक्यातील पोंधवडी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. २७ ऑक्टोबर रोजी गोट्या ऊर्फ रोहीत शिवाजी आटोळे याने जेसीबीच्या थेट बैलाच्या अंगावर नेला आणि मशीनच्या सहाय्याने त्याची हत्या केली. यानंतर बैलाला मंदिराच्या पाठीमागे पुरण्यात आलं. बैल पिसाळला असल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. बैलाची हत्या होत असताना भाऊसाहेब अण्णा खारतोडे मोबाइलवर व्हिडीओ शूट करत सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

आणखी वाचा- पिंपरी-चिंचवडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तीनजण जखमी

दोघांवर गुन्हा दाखल
बैलाची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याप्रकरणी तसंच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी गोट्या उर्फ रोहित शिवाजी आटोळे आणि भाऊसाहेब अण्णा खारतोडे या दोघांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. दोघे आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी बैलाच्या हत्येसाठी वापरण्यात आलेला जेसीबी जप्त केला आहे. तसंच मंदिरामागे पुरण्यात आलेल्या बैलाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी पशूवैद्यकीय विभागाला पत्रव्यवहार केला आहे.