रुबाबदार अधिकारी, भारदस्त व्यक्ती किंवा ग्रामीण भागाची अशी विशिष्ट ओळख बनून राहिलेली रॉयल एनफिल्डची बुलेट आता पुण्याच्या रस्तोरस्ती दिसू लागली असून, एकाच वर्षांत तिची विक्री दुपटीवर पोहोचली आहे. आकर्षक मॉडेल्समुळे तरुणाईकडून मागणी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
बुलेट म्हणजे ती खणखणीत आवाज देणारी आणि भारदस्तपणा! विशिष्ट प्रतिमेत अडकलेली ही मोटारसायकल गेल्या काही वर्षांत बदलत गेली. आकर्षक स्वरूप, वेगवेगळे रंग, सोयीचे गियर अशा बदलांमुळे ती तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय बनली आहे. आता प्रत्यक्ष विक्रीच्या आकडय़ांद्वारेही हे पाहायला मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा (२०१४-१५) बुलेटच्या विक्रीत दुपटीइतकी वाढ झाली आहे.
याबाबत किंग्स अॅटोरायडर्सचे संतोष माने यांनी सांगितले की, २०१३-१४ या वर्षांत सात हजार मोटारसायकलींची विक्री झाली होती. ती २०१४-१५ मध्ये जवळपास १५ हजारांपर्यंत पोहोचली आहे. दर महिन्याला साधारणत: दोन हजार इतक्या मोटारसायकलींची नोंदणी (बुकींग) होते. मात्र, पुरवठय़ातील कमतरतेमुळे सर्वच ग्राहकांना त्या मिळत नाहीत. मार्च महिन्याचे उदाहरण द्यायचे तर १ हजार ८०० हून अधिक गाडय़ांची नोंदणी झाली होती. प्रत्यक्षात १ हजार ४०० ग्राहकांनाच त्या उपलब्ध होऊ शकल्या.
शहरात सध्या बुलेटची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली असल्याचे सहज जाणवते. पूर्वी येज्दी, बुलेट या गाडय़ा वापरणाऱ्यांची संख्या मोठी होती. या गाडय़ा सहज चालवण्यास येत नसत आणि त्यांचे वजनही जास्त होते. नंतर नवीन गाडय़ांची संख्या वाढली आणि या गाडय़ा मागे पडत गेल्या. आपसुकच त्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणात कमी झाली. मात्र, असे असले, तरी जुन्या लोकांना आजही या गाडीबद्दल मोठे आकर्षण आहे. सध्या या गाडय़ांचीच तरुणाईला भुरळ पडली असून, या गाडय़ा वापरणाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
आकर्षण का वाढले?
‘‘सध्या बुलेटचे दहा प्रकार (मॉडेल) आहेत. त्यात ‘रॉयल इनफिल्ड क्लासिक ३५० ब्लॅक’ आणि ‘थंडरबर्ड’ या गाडय़ांना मोठी मागणी आहे. बुलेटची किंमत सव्वा लाख ते सव्वा दोन लाखापर्यंत आहे. तरीही मागणीवर काहीही परिणाम झालेला नाही. या गाडय़ांचे आकर्षण वाढण्यामागे काही कारणे आहेत. आताच्या बुलेटमध्ये इतर गाडय़ांप्रमाणेच ब्रेक आणि गिअर दिलेले आहेत. त्यामुळे ही गाडी सर्वाना चालवण्यासाठी सोपी झाली आहे. आकर्षक डिझाइन्स आहेत. महत्त्वाचे म्हणजे मायलेजमध्ये वाढ झाली आहे. आता या गाडय़ा एक लिटर पेट्रोलमध्ये सरासरी ३५ ते ४० किलोमीटपर्यंत धावतात. वजनलाही पूर्वीच्या गाडय़ांसारखी नाही. त्यामुळे आयटी आणि महाविद्यालयीन तरुणांकडून मोठय़ा प्रमाणात ही गाडी खरेदी केली जात आहे.
– संतोष माने, किंग्ज अॅटोरायडर्स (रॉयल एनफिल्डचे वितरक)