अंदाजपत्रकात अपेक्षित धरलेले उत्पन्न महापालिकेला मिळत नसल्यामुळे शहरातील विकासकामे कमी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलेला असतानाच अनावश्यक बाबींवर मात्र कोटय़वधी रुपये खर्च करण्यावर मात्र अद्यापही बंधने आलेली नाहीत. त्यामुळेच वडगाव शेरी येथील महापालिकेच्या उद्यानात तब्बल एक कोटी ३० लाख रुपये खर्च करून बुलेट टॉय ट्रेन सुरू करण्याच्या निर्णयाला आता स्थानिक नागरिकांनीच विरोध केला आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाचा आढावा या महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात घेण्यात आल्यानंतर उत्पन्नात घट आल्याचे दिसून आल्यामुळे अनेक कामांमध्ये कपात करण्यात आली आहे तसेच अनेक कामे सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला अनेक नगरसेवकांनी विरोध केला असून अत्यावश्यक विकासकामे बंद करू नयेत, अशी मागणी केली जात आहे. मात्र एकीकडे कामे बंद केलेली असतानाच काही बाबींवर मोठे खर्च करण्याचेही प्रकार महापालिकेत सुरू आहेत. वडगाव शेरी येथील उद्यानात नव्याने बुलेट टॉय ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव हे त्याचेच उदाहरण आहे. छोटय़ांच्या या गाडीसाठी तब्बल एक कोटी ३० लाख रुपये खर्च येणार आहे. त्यासाठीची निविदाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. वडगाव शेरी सनसिटी येथील उद्यानात ही रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. एक इंजिन आणि दोन डबे असे या बुलेट टॉय ट्रेनचे स्वरूप असेल. त्यासाठी उद्यानात रेल्वे रूळ बांधण्याचेही नियोजन आहे.
महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या या प्रस्तावाला प्रभाग क्रमांक १८ मधील नागरिकांनी विरोध केला असून तसे पत्रही त्यांनी वडगाव शेरी विकास मंचच्या माध्यमातून पालिका आयुक्तांना दिले आहे. महापालिकेने अंदाजपत्रकात प्रस्तावित केलेली नागरिकांसाठीची आणि नागरीहिताची कामे निधीअभावी कमी केली आहेत. अनावश्यक खर्चाला कात्री लावण्यात आली आहे, तर दुसरीकडे टॉय ट्रेनसारख्या बाबींवर तब्बल सव्वा कोटींचा खर्च केला जात आहे. महापालिकेच्या व्हेईकल डेपोतर्फे ही निविदा काढण्यात आली आहे. हा खर्च अनावश्यक असून सर्वसामान्य लोकांना किंवा मतदारांना खरोखरच उद्यानातील एवढय़ा महागडय़ा रेल्वे गाडीची आवश्यकता आहे का, असा प्रश्न नागरिकांनी प्रशासनाला विचारला आहे. आमचा या रेल्वेला विरोध नाही. मात्र महापालिकेची सद्य आर्थिक स्थिती पाहता यापेक्षा कमी दरात वा निम्म्या दरात अशाच प्रकारची योजना होऊ शकते का, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. अशा प्रकारची महागडी रेल्वे महापालिकेच्या उद्यानात सुरू करावी अशी मागणी नागरिकांनी केलेली नाही तसेच अशा योजनेची गरजही नाही. तरीही मोठय़ा खर्चाची निविदा महापालिका प्रशासनातर्फे काढण्यात आलेली आहे, असे वडगाव शेरी नागरिक मंचचे मुख्य संयोजक आशिष माने यांनी पालिका आयुक्तांना कळवले आहे.