News Flash

माउलींचा पालखी रथ सर्जा-राजा वाहणार,

माउलींची पालखी यंदा ६ जुलै रोजी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.

माउलींचा पालखी रथ सर्जा-राजा वाहणार,
माउलींचा पालखी रथ वाहणारे सर्जा-राजा

बैलजोडीचा मान घुंडरे पाटील यांच्याकडे

पुणे : साडेसहा फूट उंचीचे.. पांढऱ्या शुभ्र रंगाचे.. अर्धकोरीच्या आकाराची डौलदार शिंगे..  स्वभावाने मवाळ आणि भार पेलण्याची उच्चतम क्षमता, अशी गुणवैशिष्टय़े असलेली सर्जा आणि राजा ही बैलजोडी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचा भार वाहणार आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणाऱ्या आषाढी वारी पालखी सोहळ्यातील माउलींचा पालखीरथ वाहण्याचा मान यंदा खेड तालुक्यातील घुंडरे पाटील यांच्या बैलजोडीला मिळाला आहे.

माउलींची पालखी यंदा ६ जुलै रोजी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यानंतर २१ दिवसांनी हा सोहळा आषाढी यात्रेसाठी पंढरपूर येथे प्रवेश करेल. या संपूर्ण  प्रवासात माउलींच्या पादुका पालखीत विराजमान असतात आणि ही पालखी रथामध्ये ठेवलेली असते. हा रथाच्या बैलजोडीचा मान संपादन करण्यासाठी दरवर्षी मानकऱ्यांमध्ये चुरस असते. यंदा आळंदी देवाची येथील रामकृष्ण घुंडरे पाटील यांच्या बैलजोडीला माउलींचा रथ वाहण्याचा मान मिळाला आहे.

आमच्या घराण्याला माउलींच्या रथासाठी बैलजोडीचा मान मिळाला, याचा खूप आनंद झाला असून त्याचा अभिमान वाटतो, अशी भावना घुंडरे पाटील यांनी व्यक्त केली. सर्जा आणि राजा ही अनुक्रमे दोन आणि अडीच वर्षे वयाची बैलजोडी देखणी आणि सक्षम आहे. सध्या दोन्ही बैलांकडून आवश्यक ती मेहनत करून घेतली जात आहे. वारी सोहळ्याचे २१ दिवस त्यांच्यावर  रथ पेलण्याची, ओढण्याची जबाबदारी असल्यामुळे उत्तम खुराक आणि कठोर मेहनतीवर भर दिला आहे.

बैलजोडीच्या खुराकावर लक्ष

रामकृष्ण घुंडरे पाटील म्हणाले,की सर्जा आणि राजा या दोघांना सकाळी शेंगदाणा पेंड आणि गरजेनुसार पाणी दिले जाते. दिवसातून दोनदा वैरण, मक्याची कणसे, हिरवा चारा, कडधान्यांचा भरडा आणि गव्हाच्या पिठाचे गोळे भरवले जातात. सकस आहार आणि मेहनतीचा सराव रोज दिला जातो. आळंदीला नगरप्रदक्षिणा करण्याच्या माध्यमातून नुकतीच त्यांच्या भार वाहण्याची चाचणी घेण्यात आली आहे. आता एक जुलै रोजी पुन्हा एकदा चाचणी घेतली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2018 2:36 am

Web Title: bulls sarja raja pair for mauli palkhi
Next Stories
1 पुण्यात आठ हजार किलो कॅरीबॅग, ग्लास आणि थर्माकोल जप्त, तीन लाख ६९ हजाराचा दंड वसूल
2 धक्कादायक! पुण्यात आळंदीमध्ये ११ महिन्याच्या मुलाने गिळला रिमोटचा सेल
3 ‘चार बँकांची कर्जप्रकरणे असताना केवळ एकाच बँकेवर कारवाई का?’
Just Now!
X