हेल्मेट खरेदीतील लाखो रुपयांच्या घोटाळ्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाचा औषध खरेदी घोटाळा बुधवारी उघडकीस आला. विशेष म्हणजे, हा घोटाळा उघड होत होता तेव्हाच दुप्पट दराने औषधे खरेदी करण्याची निविदा स्थायी समितीने मंजूर केली.
 शहरातील डास आळी व जलपर्णी नाशक औषध खरेदीच्या तीन कोटी रुपयांच्या निविदांना बुधवारी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. मात्र, समितीची बैठक सुरू असतानाच माहिती अधिकारातील कार्यकर्त्यांनी जी माहिती मिळवली त्यातून ही खरेदी दुप्पट दराने होत असल्याची बाब उघड झाली. महापालिकेच्या आरोग्य विभागात सुरू असलेल्या या अनागोंदीची गंभीर दखल घ्यावी, तसेच हे प्रकरण दक्षता विभागाकडे तपासणीसाठी द्यावे व तपासणी पूर्ण होईपर्यंत खरेदीचा आदेश जारी करू नये, अशी मागणी सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
स्थायी समितीने जी निविदा मंजूर केली त्या निविदेत टेम्फॉस ५० ईसी हे कीटकनाशक दर्शवण्यात आले आहे. महापालिका या कीटकनाशकाची आठ हजार लिटर इतकी खरेदी १,१७४ रुपये प्रतिलिटर या दराने करणार आहे. त्यासाठी मूळ दर आणि व्हॅट वगैरे मिळून ९३ लाख ९२ हजार रुपये पुरवठादाराला दिले जाणार आहेत. गंभीर बाब म्हणजे याच कीटकनाशकाची खरेदी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने प्रतिलिटर ५८७ रुपये या दराने केली आहे. ज्या कंपनीकडून राज्य शासनाने हे कीटकनाशक खरेदी केले आहे त्याच कंपनीने तयार केलेले कीटकनाशक महापालिका खरेदी करणार आहे. मात्र त्यासाठी महापालिका दुप्पट दर मोजणार आहे.
या कीटकनाशकाचे उत्पादन करणाऱ्या कोरोमंडल या कंपनीनेही निविदा भरली होती. मात्र, त्या कंपनीला कागदपत्रे अपुरी असल्याचे कारण सांगून महापालिकेने स्पर्धेतून बाद केले आणि ज्या पुरवठादाराची निविदा मंजूर करण्यात आली आहे तो पुरवठादारही कोरोमंडल कंपनीचेच कीटकनाशक दुप्पट दराने पालिकेला पुरवणार आहे. अशाच प्रकारे आणखी सहा औषधांच्या खरेदीलाही मंजुरी देण्यात आली असून या सर्वाचेच मूळ दर तपासून घ्यावेत व शासनाने या औषधांची खरेदी कोणत्या दराने केली होती, याचीही माहिती घ्यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचने केली आहे.
असा झाला घोटाळा

  • – औषध तयार करणाऱ्या मूळ कंपनीला डावलले
  • – पुरवठादारादाराची दुप्पट दराची निविदा मंजूर
  • – शासनासाठी दर ५८८, पालिकेसाठी १,१७४ रुपये लिटर
  • – मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवतानाही हेतूत: अपुरी माहिती