पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ‘बर्निंग कार’ चा थरार पाहण्यास मिळाला. आज पहाटेच्या सुमारास लोणावळा कुनेगाव हद्दीत एका चारचाकी मोटारीने भरधाव वेगात असतानाच अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत मोटार महामार्गाच्या कडेला घेतली. मोटारीतून चालकाने उडी घेत स्वतः चा जीव वाचवला आहे. घटनास्थळी लोणावळा शहर पोलीस आणि देवदूत रेस्क्यू पथक दाखल झाले होते.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लोणावळ्याच्या कुनेगाव हद्दीत पहाटे साडेतीन च्या सुमारास मुंबईवरून पुण्याला येताना मारुती वॉगनर मोटारीने अचानक पेट घेतला. दरम्यान, वाहन चालकाने प्रसंगावधान राखत मोटार बाजूला घेऊन गाडीतून उडी मारली. आग खूप भीषण असल्याने यात मोटार मात्र जळून खाक झाली आहे. मोटार जळत असताना टायर फुटल्याचे आवाज जोरजोरात येत होते.

मोटार द्रुतगती मार्गाच्या सर्व्हिस रोडवर असल्याने वाहतूक काही वेळासाठी धीमी सुरू होती. घटनास्थळी देवदूत रेस्क्यू टीम, महामार्ग पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मोटारीने पेट घेतल्याचे कारण समजू शकलेले नाही. घटनेचा अधिक तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत.