News Flash

प्रवासी बसच्या डिकीतून ‘स्पेशल बर्फी’ची वाहतूक

स्पेशल बर्फी पुण्यात विक्रीकरिता आणली जाणार असल्याची माहिती एफडीएला प्राप्त झाली होती.

गुजरातमधून आलेला माल जप्त

गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवासी बसच्या डिकीतून पोत्यासारख्या मोठय़ा पिशव्यांमधून ‘स्पेशल बर्फी’ या नावाने माल विक्रीस येत असल्याचे उघडकीस आले आहे. गुजरातमधून अनियंत्रित तापमानात व अस्वच्छ वातावरणात आणलेला असा ९ लाख रुपयांचा बर्फीचा साठा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुरुवारी जप्त केला. त्याच्या एकच दिवस आधी पुण्यात आणखी ५ लाखांची बर्फी जप्त करण्यात आली आहे.

व्हेजिटेबल फॅट आणि स्किम्ड मिल्क पावडरपासून तयार केलेली स्पेशल बर्फी पुण्यात विक्रीकरिता आणली जाणार असल्याची माहिती एफडीएला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने केलेल्या कारवाईत बुधवारी ३ हजार किलो बर्फीचा साठा सापडल्याची माहिती पुण्याच्या अन्न विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली. त्यानंतर १ सप्टेंबरला गुजरात राज्यातून प्रवासी बसमधून माल येणार असल्याचे कळल्यावर उर्से टोलनाका परिसरात केलेल्या तपासणीत चार प्रवासी बसमध्ये ४ हजार किलोची स्पेशल बर्फी सापडली.

मिठाई व खवा उत्पादकांची बैठक

एफडीएने खवा, बर्फी, गाईचे व म्हशीचे तूप आणि खाद्यतेलाचा तब्बल २९ लाख रुपयांचा साठा संशयावरून जप्त केला असून या खाद्यपदार्थाचे ४० नमुने घेतले आहेत. खूप स्वस्त दरातील, दर्जाबद्दल संशय असलेला तसेच अस्वच्छ वातावरणात साठवणूक व वाहतूक केला जाणारा खाद्यमाल जप्त करण्यात आल्याचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘अन्नपदार्थाची तपासणी मोहीम उत्सवकाळात सुरू राहणार आहे.

आम्ही मिठाई व खवा उत्पादकांची बैठक घेऊन त्यांना अन्नपदार्थाच्या दर्जाबद्दल सूचना दिल्या असून मिठाई बनवणाऱ्यांनी लागेल तेवढीच मिठाई तयार करावी, असेही सांगण्यात आले आहे. शहराचे तीन भाग करून त्यासाठी बावीस अन्न सुरक्षा अधिकारी व तीन सहायक आयुक्त यांची पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके गणेश मंडळांना भेटी देऊन प्रसाद वाटपातून अन्न विषबाधेचे प्रकार घडू नयेत यासाठी मार्गदर्शन करतील.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 3:48 am

Web Title: bus passenger dickey use for special barfi supply
Next Stories
1 गणेशोत्सवासाठीची महापालिकेची तयारी पूर्ण
2 मानाच्या गणपतींची माध्यान्हीपूर्वीच प्रतिष्ठापना
3 पीएमपीच्या सेवेबाबत प्रवाशांचा नाराजीचा सूर
Just Now!
X