सहकारनगर येथील नाला गार्डन आणि फुलपाखरू उद्यानाच्या जागेवर कोणत्याही परिस्थितीत तारांगण प्रकल्प राबवू नये, अशी आग्रही मागणी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे शुक्रवारी स्थानिक नागरिक, नगरसेविका व कार्यकर्त्यांनी केली.
फुलपाखरू उद्यान आणि तारांगण या दोन प्रकल्पांबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर आयुक्त कुणाल कुमार यांनी शुक्रवारी या जागेची पाहणी केली. स्थानिक नगरसेविका अश्विनी कदम, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, भवन विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी नितीन कदम व नागरिक या वेळी उपस्थित होते. ज्या ठिकाणी तारांगण प्रकल्पाचे बांधकाम करण्याचे नियोजन केले जात आहे, ती जागा नाल्याच्या काठाची असून ती हरित पट्टय़ात येते. या पट्टय़ात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. त्यामुळे येथे बांधकाम करणे नियमात बसणार नाही. तसेच या बांधकामामुळे सध्या असलेल्या फुलपाखरू उद्यानाचीही हानी होणार आहे. त्यामुळे माझा आणि स्थानिक नागरिकांचा तारांगण प्रकल्पाला विरोध आहे, असे नगरसेविका कदम यांनी या वेळी आयुक्तांना सांगितले.
फुलपाखरू उद्यानाच्या जागी नव्याने आखला जात असलेला प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेच्या मुख्य सभेची परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच या प्रकल्पाच्या निविदा केव्हा मंजूर झाल्या तेही कोणाला माहिती नाही. महापालिकेच्या सर्व विभागांचा विशेषत: उद्यान विभागाचा या प्रकल्पाला विरोध असून तरीही तेथे नवा प्रकल्प का केला जात आहे, अशीही विचारणा कदम यांनी केली आहे. शहरासाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखडय़ातही या जागेवर उद्यानाचाच प्रस्ताव आहे. त्यामुळे नाला उद्यान कायम ठेवणे आवश्यक आहे, असेही पत्र कदम यांनी आयुक्तांना या वेळी दिले.
आयुक्त व अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीनंतर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता फुलपाखरू उद्यानाच्या जागेवर नवा प्रकल्प केला जाणार नाही असे सांगण्यात आले, अशी माहिती नितीन कदम यांनी महापालिकेत पत्रकार परिषदेत दिली.