महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४० मधील एका जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी झाली असून पक्षांना उमेदवारांचीही पळवापळवी करावी लागली आहे. काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची झाली असून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी नऊ अर्ज दाखल झाले.
प्रभाग ४० मधील पोटनिवडणुकीसाठी ७ जुलै रोजी मतदान होत आहे. मंगळवार हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. ही जागा मनसेकडे होती. त्यामुळे त्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, मनसेने स्वत:चा उमेदवार देण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका इंदुमती नारायण फुलावरे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने गेल्यावेळी त्याच पक्षाकडून निवडणूक लढवलेल्या लक्ष्मी बाळासाहेब घोडके यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, काँग्रेसचेच पूर्वीचे कार्यकर्ते अशोक लांडगे यांची पत्नी कस्तुरी यांनीही अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निवडणुकीत उमेदवार दिला जाणार नाही, अशी चर्चा प्रारंभी होती. मात्र, त्या पक्षानेही नीलम महेंद्र लालबिगे यांना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. राष्ट्रवादीने लालबिगे यांना उमेदवारी दिली असली, तरी त्या पक्षाच्या शोभा पांडुरंग गायकवाड यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.
भारतीय जनता पक्षालाही बंडखोरीचा फटका बसला आहे. भाजपने संध्या अमित बरके यांना उमेदवारी दिली असली, तरी या प्रभागात ज्यांनी गेल्या वेळी भाजपकडून निवडणूक लढवली होती, त्या माई दिनेश नायकू यांनीही बंडखोरी करून अर्ज भरला आहे. युतीमध्ये ही जागा भाजपकडे असल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराने निवडणूक लढणे अपेक्षित नव्हते. मात्र, शिवसेनेच्या प्रतिभा उत्तम भुजबळ यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्यामुळे युतीचेही दोन उमेदवार आमने-सामने आल्याचे चित्र आहे. या शिवाय विजया बाळासाहेब बरके यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.
महापालिकेत सध्या मनसे आणि काँग्रेस यांचे संख्याबळ २८-२८ असे समान असल्यामुळे दोन्ही पक्षांसाठी ही जागा प्रतिष्ठेची झाली आहे. मनसेने ही जागाजिंकल्यास त्यांना पुन्हा विरोधी पक्षनेता हे पद मिळू शकते, तर काँग्रेसने ही जागा जिंकल्यास त्यांच्याकडील हे पद कायम राहू शकते. उमेदवारी अर्जाची छाननी बुधवारी (१९ जून) होणार असून अर्ज मागे घेण्यासाठी २२ जूनपर्यंत मुदत आहे.