राज्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा 90.66 टक्के इतका लागला आहे. या निकालामध्ये रात्र शाळेचा देखील चांगला निकाल लागला आहे. यामध्ये पुण्यातील पूना नाईट स्कूलमध्ये हॉटेलमध्ये काम करून बारावीची परीक्षा देणार्‍या कुणाल सुरेश बेंडल, या विद्यार्थीने 77 टक्के गुण मिळवून, दुसरा क्रमांक मिळवला आहे. या तरुणाला सीए होण्याच स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले.

या यशाबद्दल कुणाल सुरेश बेंडल याच्याशी संवाद साधला असता तो म्हणाला की, मी मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील खिर्शीद या गावातील आहे. घरी अगदी काही प्रमाणात शेती असून घरची हालकीची परिस्थिती आहे. त्यामुळे माझे गावी दहावीपर्यंत शिक्षण झाले. पुढच शिक्षण घेण्यासाठी पुणे गाठायचे ठरविले आणि 2018 साली पुण्यात आलो. पुण्यात माझे मित्र असल्याने मी इथे येण्याचे ठरवले. इथे आल्यावर एका हॉटेलमध्ये काम देखील मिळाले. त्यानंतर काम करण्यास सुरुवात केली. नाईट स्कूलमध्ये अकरावी मध्ये प्रवेश मिळाला. त्यावेळी देखील चांगले गुण मिळाले. अकरावीच्या परीक्षेचे एवढे टेंशन नव्हते. पण बारावीचे खूप टेंशन होते. मात्र माझ्या सोबत काम करणार्‍या सर्वांनी या वर्षी सहकार्य केल्याने मला आज यश मिळाले. आता पुढे पदवीचे शिक्षण घेऊन, सीए व्हायचे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यातील नाईट स्कूलचा 82 टक्के निकाल

राज्यात एकूण 168 नाईट स्कूल, त्यामध्ये 54 ज्युनिअर कॉलेज आहेत. पुण्यातील पूना नाईट हायस्कूल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्ट ज्युनिअर कॉलेज 12 वाणिज्य शाखेचा 82 टक्के इतका निकाल लागला आहे. या रात्र शाळेतून 114 मुले बसले होते. त्यापैकी 92 विद्यार्थी पास झाले आहेत.