विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) कं पनी सचिव (सीएस), सनदी लेखापाल (सीए) आणि कॉस्ट अकाउंटंट या अभ्यासक्रमांना पदव्युत्तर पदवी समकक्षता दिली आहे. त्यामुळे हे अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले उमेदवार नेट परीक्षेसाठी पात्र ठरतील, पीएच.डी. करू शकतील, तसेच शिक्षणासाठी परदेशी जायचे असल्यास त्यासाठीही फायदा होऊ शकणार आहे.

यूजीसीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या तीन अभ्यासक्रमांना पदव्युत्तर पदवीची समकक्षता देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याचे परिपत्रक यूजीसीने प्रसिद्ध के ले आहे. जगभरात कं पनी सचिव, सनदी लेखापाल आणि कॉस्ट अकाउंटंट ही पात्रता पदव्युत्तर पदवीच्या समकक्ष मानली जाते. मात्र आतापर्यंत या अभ्यासक्रमांना पदव्युत्तर पदवीची समकक्षता नव्हती. त्यामुळे ही समकक्षता मिळण्यासाठी गेली काही वर्षे मागणी करण्यात येत होती. सनदी लेखापालांची नियामक संस्था आयसीएआय, कं पनी सचिवांची नियामक संस्था आयसीएसआय आणि कॉस्ट अकाउंटंट्सची नियामक संस्था आयसीडब्ल्यूएआय यांनी ही समक्षकता मिळण्यासाठी यूजीसी आणि सरकारकडे पाठपुरावाही केला. या पार्श्वभूमीवर यूजीसीकडून या तीनही अभ्यासक्रमांना पदव्युत्तर पदवीची समक्षकता देण्याचा निर्णय घेण्यात आला. तीनही अभ्यासक्रमाच्या नियामक संस्थांनी त्यांच्या संकेतस्थळावरही समकक्षता मिळाल्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.