प्रवाशांचा मनस्ताप कायमच, अनेक योजनांचे लाभ मिळतच नसल्याची तक्रार

प्रचलित सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधांना पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या ‘कॅब’ सुविधेला ग्राहकांनी स्वीकारल्यानंतर आता प्रत्यक्षात प्रवाशांना कॅब सुविधेचाही मनस्तापच होऊ लागला आहे. सध्या अ‍ॅपवर आधारित कॅबची सुविधा देणाऱ्या कंपन्यांकडूनही सणासुदीचे औचित्य साधून वेगवेगळ्या योजनांची जाहिरातबाजी करण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र यातील अनेक योजनांचे लाभ मिळतच नसल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

शहरांतर्गत वाहतुकीच्या दृष्टीने मोठय़ा प्रमाणावर रिक्षा असतानाही ओला, उबेर कंपन्यांच्या शहरांतर्गत कॅब सुविधेने मागील दोन वर्षांत शहरात चांगलाच जम बसविला. ग्राहकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी सण-उत्सवाच्या दिवसांमध्ये कंपन्यांनी विविध योजना, सवलती जाहीर केल्या. मात्र प्रत्यक्षात या योजनांचा लाभ मिळतच नसल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे. याबाबत आणि चालकांकडून होणाऱ्या मनस्तापाबाबत प्रवाशांनी त्यांच्या भावना ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केल्या.

चांगली, सुरक्षित आणि हमखास सुविधा मिळत असेल तर पैसे खर्च झाले तरीही चालतील अशा मानसिकतेतून प्रवाशांनीही या सेवेचे गर्दीच्या वेळी किंवा मागणी जास्त असेल तर जास्त दर आणि मागणी कमी असेल तर कमी दर हे गणितही स्वीकारले. मात्र आता एखादीच कॅब सुरू ठेवून मागणी आणि पर्यायाने दर वाढवायचे अशा क्लृप्त्या चालकांकडून करण्यात येतात. त्यामुळे मूळ दरापेक्षा अनेक पटींनी प्रवासभाडे वाढते. त्यातून काही टक्के सवलत मिळाली तरीही प्रवास भाडे हे नेहमीपेक्षा जास्तच असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे एखादी सवलत किंवा योजनेत कॅबसाठी नोंद केल्यानंतर दिलेल्या वेळेत कॅब येतच नाही. ठराविक अंतरासाठी एक भाडे निश्चित करण्याची आणि ट्रिप रद्द केल्यावर दंड आकारण्यात येणार नाही अशी योजना कंपनीकडून देण्यात आली. मात्र या योजनेमध्ये वाहनासाठी नोंदणी केल्यावर बहुतेकवेळा गाडी प्रवाशाला जेथून सेवा हवी आहे, त्या ठिकाणापासून १० ते १५ मिनिटाच्या अंतरावर दिसते. प्रत्यक्षात नोंद केल्यावर कॅबचालक आपल्या दिशेला न येता विरुद्ध दिशेलाच जात असल्याचे नकाशावर दिसते. त्यानंतर वाट पाहण्याचा कालावधी वाढतो. वाहनासाठी नोंदणी करताना दाखवण्यात आलेल्या वेळेत गाडय़ा येतच नाहीत. त्याचप्रमाणे या योजनांचे ‘प्रोमो कोड’ टाकूनही त्याचे लाभ मिळत नाहीत, अशा तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत.

शेअर कॅब सुरक्षित नाही

कंपन्यांनी एक कॅब तीन किंवा चार जणांमध्ये ‘शेअर’ करण्याच्या योजना आणल्या आहेत. एकटय़ाने कॅबसाठी नोंद करण्याऐवजी हा पर्याय स्वस्त वाटतो. प्रत्यक्षात एका कॅबमध्ये एकाच दिशेने जाणाऱ्या किंवा एकाच बाजूला जाणाऱ्या प्रवाशांची नोंद अनेकवेळा दिसत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी जाण्यासाठी साधारणपणे अर्धातास लागत असेल तेथे इतर प्रवाशांना वेगवेगळ्या भागांत सोडून जाण्यासाठी दुप्पट वेळ लागतो. त्याचप्रमाणे जवळचा मार्ग असेल तरी कॅबचालक त्या मार्गाने कॅब नेत नाहीत. नकाशावर दाखवण्यात आलेल्या मार्गानेच कॅब नेण्यात येत असल्याचे उत्तर प्रवाशांना दिले जाते. डेक्कनपासून सिंहगड रस्त्यावर जाण्यासाठी एका चालकाने कॅब कोथरूड, वारजे येथून नेली. दरम्यान अ‍ॅपवर नोंद केलेले आम्ही दोन प्रवासी आणि वाटेत पूर्व नोंदणी नसतानाही बस स्टॉपवर कॅब थांबवून दोन प्रवासी घेतले.
– शलाका ओक

रिक्षा तर मिळतच नाहीत

एका कंपनीने कॅबबरोबर रिक्षांसाठीही नोंदणी करण्यात येत असल्याची जाहिरात केली आहे. अ‍ॅपवर जवळपास कॅब उपलब्ध नसल्याचे दिसत असले तरी रिक्षा दिसत असतात. अगदी जवळपास १ किंवा २ मिनिटांच्या अंतरावर रिक्षा असल्याचे दिसते. प्रत्यक्षात या रिक्षांसाठी नोंद केल्यावर मात्र त्या कधीही येत नाहीत. त्याचप्रमाणे कॅबसाठी नोंद करण्यापूर्वी ३ किंवा ४ मिनिटांवर कॅब असल्याचे दिसते. प्रत्यक्ष नोंद झाल्यावर कॅब येण्यास १५ ते २० मिनिटे कालावधी लागणार असल्याचे दिसते. मात्र त्यानंतरही ती कधीच दिलेल्या वेळेत येत नाही. सुरुवातीला ३ मिनिटांवर दिसणारी कॅब प्रत्यक्षात येण्यासाठी अर्धा ते पाऊणतास लागतो. – क्षिप्रा भोसले

ट्रिप नाकारणाऱ्या चालकांवर कारवाई हवी

मी विमानतळावर जाण्यासाठी कॅबसाठी नोंद केली. कॅबसुद्धा वेळेत मिळत नसल्यामुळे किंवा वेळेवर येत नसल्यामुळे हातात काही वेळ ठेवून कॅब बुक केली होती. त्यानंतर गाडीचा क्रमांक, चालकाचा क्रमांक असे तपशील आले. अर्ध्या तासानंतर चालकाचा फोन आला आणि त्याने येता येणार नाही असे सांगितले आणि ट्रिप रद्द केली. ट्रिप रद्द केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या कॅबचा शोध घ्यावा लागतो. त्यानंतर ती येण्यापर्यंत वाट पाहणे यात खूप वेळ जातो. अशाच प्रकारचा अनुभव मला तीन वेळा आला आहे. विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी अशाप्रकारे चालकांनी ट्रिप रद्द करणे खूप मनस्तापदायक ठरते. अशा चालकांवर कंपन्यांनी कडक कारवाई करणे आवश्यक आहे. – डॉ. एस. पी. दाणी

कॅब चालकांचा उद्धटपणा नेहमीचाच

मी बोस्टनमध्ये राहतो. गेल्यावर्षी पुण्यात आलो असताना मलाही कॅबबाबत वाईट अनुभव आले. चालकांकडून आयत्यावेळी ट्रिप रद्द होणे, जास्त पैसे मागणे, वेळेवर न येणे अशा प्रकारचे अनुभव येणे हे पुण्यात नियमित झाले आहे. – ए. जी. जोशी

फसवेगिरी आणि लूट

पुणे रेल्वे स्थानकावरून ९ ऑगस्टला मला सहकारनगर पोलीस चौकीजवळ जायचे होते. त्यामुळे माझ्याकडील मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून मी उबेर कॅबसाठी सहकारनगर पोलीस चौकीसाठी सर्च केले. सर्च झाले तेव्हा या प्रवासासाठी १३० रुपये भाडे दाखविण्यात आले. मात्र, प्रवासासाठी ओके करताच २००.४४ रुपये भाडे दाखविण्यात आले. या मार्गावर मी नेहमी प्रवास करतो. पुणे स्टेशन ते सहकारनगर पौलीस चौकीपर्यंत सुमारे १२० ते १४० रुपये भाडे होते. मात्र, त्या दिवशी मला उशीर होत असल्याने कॅबमध्ये बसलो. सहकारनगर पोलीस चौकी सहकारनगर नंबर एकमध्ये आहे. असे असतानाही कॅब चालक मला सहकारनगर नंबर दोनमध्ये घेऊन जात होता. मी याबाबत चालकाला विचारणा केले असता, ‘मला लोकेशन तिकडचे दाखवित आहे’ असे उत्तर त्याने दिले. कसाबसा मी घरी पोहोचलो तेव्हा २२४.६५ रुपये भाडे झाले होते. मी या भाडेआकारणीबाबतही चालकाला विचारले. पण, हेच भाडे असल्याचे चालकाने सांगितले. अशा प्रकारे प्रवाशांची फसवेगिरी आणि लूट करण्यात येत आहे. पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी त्यात लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, हीच अपेक्षा
– सुरेश छाजेड

कॅबवर प्रशासकीय नियंत्रण आवश्यकच

मोबाइल अ‍ॅपवर चालणाऱ्या प्रवासी सेवांना शहरांतर्गत वाहतुकीची परवानगी नसल्याने त्यावर बंदी घालण्याची मागणी रिक्षा संघटनांकडून वेळोवेळी करण्यात आली आहे. त्याबाबत वर्तमानपत्रातही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रशासनाने आजवर याबाबत समर्पक उत्तर दिलेले नाही. दुसरीकडे शहरांतर्गत वाहतुकीसाठी चांगला पर्याय म्हणून मोबाइल अ‍ॅपवरील ओला किंवा उबर आदी प्रवासी वाहतुकीला प्रवाशांनी स्वीकारले. केवळ स्वीकारलेच नव्हे, तर भरभरून प्रतिसादही दिला आहे. तो दिवसेंदिवस वाढतही आहे. मात्र, काही तांत्रिक बाबी आणि अपप्रवृत्तींमुळे या प्रवासी सेवेतूनही प्रवाशांची लूट सुरू करण्यात आली आहे. रिक्षा चालकांप्रमाणे भाडे नाकारणे, मनमानी भाडे आकारणीचे प्रकार सुरू करण्यात आले आहेत. रिक्षा सेवेवर प्रशासकीय नियंत्रण आहे. रिक्षाचे भाडे प्रशासन ठरविते त्याचप्रमाणे रिक्षाविरोधात तक्रार दाखल करता येते. तशी प्रशासकीय व्यवस्था अ‍ॅपवरील कॅब सेवेबाबत नाही. ही सेवा देणाऱ्या चालकांवरही नियंत्रण नाही. त्यामुळे प्रवाशांची गरज ओळखून ही कॅब सेवाही प्रशासकीय नियंत्रणाखाली आणण्याची गरज आहे. – संदीप गुरव