माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याची दहशतवादविरोधी पथकाद्वारे चौकशी करण्याची वेळ प्रथमच आली असून ही बाब अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी सर्व काही मिळालेली माहिती या सरकारने जाहीर करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी इंदापूर येथे केली.
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाने इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी काँग्रेसचे नूतन पदाधिकारी डॉ. रत्नाकर महाजन, रमेश बागवे, उल्हास पवार, संजय जगताप, आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, भरत शहा आदी मान्यवरांचा सत्कार श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
चव्हाण म्हणाले, की देशातील व राज्यातील दुष्काळ हाताळण्यात केंद्र व राज्यातील सरकारला अपयश आले. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने या सरकारने पाळली नाहीत. शेतमालाला बाजारभाव नाही. शेतीला पाणी नाही. जनावरांना चारापाणी हे सरकार दुष्काळात देऊ शकले नाही. शेतकऱ्याला आम्ही मागणी करूनही कर्ज माफी केली नाही. याचा परिणाम मागील वर्षी तीन हजार दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सामाजिक सलोखा बिघडून दलित व मुस्लिमावर अन्याय होऊन असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा जाब आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात विचारला जाईल. चव्हाण पुढे म्हणाले, की तूरडाळ साठा बंदी घालण्यात आली होती. ती या सरकारने उठवून कोणाचा फायदा झाला – तोटा झाला, याचाही जाब विचारावा लागेल. याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. एका देशद्रोह्याचे फोन कॅबिनेट मंत्री खडसे यांना येत होते, ते कशासाठी येत्होते, याचा खुलासा करावा, अशी मागणी चव्हाण यांनी या वेळी केली.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, की आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. या दुष्काळात राज्यातील शेतकऱ्यांचे हाल झाले. राज्याच्या प्रमुखांचे नियंत्रण प्रशासनावर राहिले नाही.