वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापून त्याचे फोटो फेसबुकवर टाकणे एका बर्थडे बॉयला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी बर्थडे बॉयसह दहा जणांवर गुन्हा दाखल केला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सांगवी परिसरातील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर येथे ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज खंडू काटे (वय २८, रा. पिंपळे सौदागर) याचा वाढदिवस २४ फेब्रुवारी रोजी धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. वाढदिवस साजरा होत असताना सूरज काटे याने तलवारीने केक कापला, याचे फोटो सूरजने फेसबुकवर टाकले. याची माहिती सांगवी पोलिसांना कळताच चौकशीनंतर आज (दि.१४) बर्थडेबॉयसह दहा जणांवर गुन्हा दाखल केला. सूरज काटे, नीरज काटे, रामदास धनवटे, गणेश धनवटे, अक्षय रासकर यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बर्थडेबॉयसह दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत.

तलवारीसारखी ९ इंचापेक्षा जास्त लांबीची धारदार हत्यारे जमाव जमलेल्या सार्वजनिक ठिकाणी वापरण्यास कायदेशीर बंदी आहे. त्यामुळे वाढदिवस साजरा करताना सुरीने केक कापण्याऐवजी तलवारीचा वापर केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे यांनी दिली आहे.

गेल्या महिन्यात खेड परिसरातील मांजरेवाडीमध्ये देखी असाच प्रकार समोर आला होता. ओमकार टाकळकर (वय २२) या तरुणाने तलवारीने केक कापल्याने बर्थडे बॉयसह पाच जणांवर खेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ओमकारचा वाढदिवस साजरा करताना तलवारी केक कापल्याचे फोटो त्याच्या एका मित्राने दुसऱ्या मित्रांना व्हॉट्सअॅपवर पाठवले होते.