हापूस आंबा आणि कॅल्शिम कार्बाइडची पांढरी पावडर यांचे नाते जुनेच. ऊन्हाळा सुरू होताच हापूसचे वेध लागत असले तरी दुसरीकडे हा आंबा चांगल्या दर्जाचा असेल ना, की ‘कॅल्शियम कार्बाइड’ लावून झटपट पिकवलेला असेल, ही चिंता नागरिकांना भेडसावते. या वर्षीचा प्रचंड उन्हाळा एका अर्थी सामान्यांच्या वैतागास कारणीभूत ठरला असला तरी त्यामुळे हापूस आंबे पिकण्यास मदत होऊन चांगले आंबे खायला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
यंदा फेब्रुवारीच्या शेवटापासून आंबा बाजारात आला, तर मार्चमध्येही त्याची नियमित आवक राहिली. तापमानच इतके जास्त आहे, की आंबे पिकवण्यासाठी आम्हाला वेगळे काही करावेच लागणार नाही, उष्णतेमुळेच आंबा पिकेल, असे आंबाविक्रेते म्हणत होते. मे मध्ये एव्हाना आंब्याचा निम्मा हंगाम संपल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कॅल्शियम कार्बाइडबाबत केलेल्या तपासण्यांमध्ये अद्याप तरी कार्बाइड लावून आंबा पिकवल्याचे आढळलेले नाही. या सर्व गोष्टींमुळे नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एफडीएच्या अन्न विभागाचे सह आयुक्त शशिकांत केकरे म्हणाले,‘या वर्षी शहरातील प्रमुख आंबा बाजारांमध्ये कार्बाइडचा वापर दिसून आलेला नाही. एपडीएने विक्रेत्यांना केलेल्या आवाहनास चांगला प्रतिसाद आहे. आम्ही पुण्यात ७ ठिकाणी व पिंपरी-चिंचवडमध्ये ६ ठिकाणी तपासण्या केल्या असून त्या व्यतिरिक्त अचानक भेट देऊनही पाहणी करत आहोत.’