सरते वर्ष टॅब्ज आणि स्मार्टफोनचे ठरले. मात्र, त्याचा परिणाम डायरी आणि कॅलेंडरच्या विक्रीवर झाला असून नव्या वर्षांसाठी कॅलेंडर किंवा डायरी खरेदी करण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. या वर्षी नव्या वर्षांच्या डायरी आणि कॅलेंडर्सना अजिबातच मागणी नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
नव्या वर्षांची सुरूवात ही नवी डायरी आणि नव्या कॅलेंडरने होत असे. डायरी, कॅलेंडर्स, प्लॅनर्स यांच्या विक्रीसाठी डिसेंबर महिन्यात दुकानदारांना स्वतंत्र विभाग सुरू करावा लागत असे. मात्र, आता स्मार्टफोन्स आणि टॅब्जनी डायरी, प्लॅनर्स यांची जागा घेतली आहे. त्यामुळे डायरी घेऊन रोजच्या नोंदी ठेवणे कालबाह्य़ होऊ लागले आहे. कॅलेंडर्सही आता अँड्रॉईड, विंडोजवर उपलब्ध आहेत. याचा फटका डायरी आणि कॅलेंडर्सच्या विक्रीला बसला आहे.
यावर्षी डायरी, प्लॅनर्स यांची विक्री अजिबातच झाली नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणेच वेगवेगळ्या गरजांनुसार बाजारपेठेत डायऱ्या उपलब्ध आहेत. हिशेबासाठी, रोजनिशी लिहिण्यासाठी, रोजच्या भेटी-गाठी, बैठका याच्या नोंदीसाठी वेगवेगळ्या डायऱ्या, प्लॅनर्स बाजारात आहेत. मात्र, यावर्षी डायऱ्यांसाठी अजिबातच मागणी नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. अप्पा बळवंत चौकामधील एका विक्रेत्याने सांगितले, ‘‘गेल्या दोन वर्षांंपर्यंत डिसेंबर महिन्यामध्ये किमान चारशे-पाचशे डायऱ्यांची विक्री होत होती. भेट देण्यासाठी आवर्जून डायऱ्यांची खरेदी केली जायची. मात्र, यावर्षी अगदी दहा डायऱ्यांचीही विक्री झालेली नाही.’’
कॅलेंडर्सची मागणी कमी झाली आहे. मात्र, अजूनही ठराविक कॅलेंडर्स घेतली जातात. तिथी आणि सणांची माहिती असणाऱ्या कॅलेंडर्सना अजूनही मागणी आहे. मात्र, त्याचे प्रमाण कमी झाले आहे, असे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले आहे.
डायरी, कॅलेंडर ऐवजी कीचेन्स, पेन्स
नव्या वर्षांला आवर्जून डायरी आणि कॅलेंडर्स भेट दिली जात असत. कंपन्या स्वत:ची कॅलेंडर्स आणि डायऱ्या तयार करत असत. मात्र, आता अनेक कंपन्यांनी आपल्या डायऱ्या आणि कॅलेंडर्स प्रसिद्ध करणे बंद केले आहे. आता नव्या वर्षांची भेट म्हणून कॅलेंडर्स आणि डायऱ्यांची जागा कीचेन्स, पेन्स, पेनड्राईव्हजनी घेतली आहे.