अक्षरं ही केवळ लेखनासाठी नाहीत, तर वळणदार लेखनातून ती सुंदर होऊ शकतात. अक्षरांकडे पाहण्याची दृष्टी बदलली तर आपल्याला लिपींचे महत्त्व समजू शकेल. हे ध्यानात घेऊनच जगभरातील आणि भारतातील प्रादेशिक भाषांमध्ये असलेल्या लिपींची समृद्धी १ ते ७ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या ‘कॅलिफेस्ट’मधून  कलाप्रेमींना उलगडणार आहे.
एखादी संस्कृती ही किती समृद्ध आहे हे तिच्या लिपीवरून ठरविले जाते. त्यामुळे लिपी ही त्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असते हेच लक्षात घेऊन १७ लिपींच्या श्रीमंतीचे दर्शन घडविणाऱ्या या ‘कॅलिफेस्ट’मध्ये प्रदर्शन, कार्यशाळा, व्याख्यानसत्र आणि प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे. अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी आणि स्वयंभू फाउंडेशन यांच्यातर्फे घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन येथे हा कॅलिफेस्ट होणार असल्याची माहिती प्रसिद्ध सुलेखनकार (कॅलिग्राफर) अच्युत पालव यांनी दिली. स्वयंभू फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ शिरोळे या वेळी उपस्थित होते.
अच्युत पालव म्हणाले,की आपला देश शेतीप्रधान आहे तसाच तो लिपीप्रधान आहे. भारतातील सर्व प्रांतांमध्ये जाऊन मी सुलेखनकला शिकविली आहे. त्या त्या प्रांतातील लिपीचाही अभ्यास केला. कॅलिफेस्टमध्ये रशियन, जर्मन, ऊर्दू, पर्शियन, जपानी, तिबेटियन यांबरोबरच देवनागरी, गुजराती, गुरुमुखी, पंजाबी, बंगाली, मल्याळम, तमीळ, तेलगू, कन्नड, ओरिया आणि आसामी अशा १७ लिपींचा अंतर्भाव आहे. या समृद्ध लिपी एका ठिकाणी पाहता याव्यात आणि त्यांचा समग्रपणे विचार करता यावा हाच कॅलिफेस्टचा उद्देश आहे. हा अक्षरांचा संस्कार डोळ्यांनी पहावा आणि मनामध्ये साठवून हा संस्कार आत्मसात करावा, ही कॅलिफेस्टच्या आयोजनामागची भूमिका आहे.
‘अक्षरयात्रा’ या अनोख्या कार्यक्रमाने १ डिसेंबर रोजी कॅलिफेस्टचे उद्घाटन होणार आहे. या महोत्सवात ज्योती इरी (जपानी),  कमलजीत कौर (गुरुमुखी), हिरन मित्रा (बंगाली), प्रा. संतोष क्षीरसागर (देवनागरी)  सॅल्वा रसूल आणि अस्लम किरातपुरी (ऊर्दू) वेगवेगळ्या लिपीमध्ये सुलेखन कसे करावे यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. तिबेटियन, मल्याळम लिपींचेही मार्गदर्शन होणार आहे. केवळ कार्यशाळाच नाही, तर या महोत्सवात अनेक लिप्या जवळून पाहण्याची, त्या समजून घेण्याची संधीही पुणेकरांना उपलब्ध होणार आहे, असेही पालव यांनी सांगितले.