मोबाईलवरून सलग संभाषण करणे मागील काही दिवसांपासून एक दिव्यच झाले असून, सर्वच मोबाईल कंपन्यांबाबत ‘कॉल ड्रॉप’ च्या अनेक तक्रारी ग्राहकांकडून करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे कोणतीही मागणी न करता अचानक एखादा प्लॅन देऊन पैसे कमाविण्याचे प्रकारही सुरू आहेत. ग्राहकाला फसविण्याचे विविध प्रकार वापरून मोबाईल कंपन्यांनी सध्या लुटीचा धंदाच सुरू केला असल्याचे दिसते आहे.
मोबाईल कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये कॉलचे दर कमीत कमी ठेवून ग्राहकांना आकर्षित केले गेले. मात्र हळूहळू या कंपन्यांचा खरा चेहरा समोर येताना दिसतो आहे. कॉलचा दर कमी ठेवण्यात येत असला, तरी वेगवेगळ्या माध्यमातून ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचे उद्योग सुरू करण्यात आले आहेत. त्यात सध्या बहुतांश ग्राहकांना भेडसावणाऱ्या ‘कॉल ड्रॉप’ चा प्रामुख्याने समावेश आहे. मोबाईल संभाषण सुरू असताना अचानक कॉल बंद होतो. तांत्रिक कारण असल्याचे सुरुवातीला अनेकांना वाटते. मात्र, दोन्ही मोबाईल रेंजमध्ये असतानाही हे प्रकार घडतात. बहुतांश ग्राहकांकडून मोबाईलवरील संभाषणासाठी ठराविक कालावधीसाठी ठराविक रक्कम आकारली जाते. काही सेकंदात ‘कॉल ड्रॉप’ झाल्यास ही संपूर्ण रक्कम ग्राहकांच्या माथी लागते. दिवसभरात एका ग्राहकांचे असे १५ ते २० ‘कॉल ड्रॉप’ होत असल्याच्याही तक्रारी आहेत. त्यातून होत असलेली छुपी लूट आता समोर येत आहे.
मोबाईल रेंजमध्ये असताना येणारे कॉल अडवून ठेवण्याचा ‘उद्योग’ ही काही कंपन्यांनी सुरू केला आहे. हा कॉल अडवून नंतर संबंधित ग्राहकाला अमूक क्रमांकावरून आपल्याला कॉल येत होता, असा एसएमएस पाठविला जातो व त्यासाठी पैसे आकारले जातात. ग्राहकाच्या खिशाला ही कात्री लागल्यानंतर संबंधितांशी संपर्क करण्यासाठी पुन्हा मोबाईल बिलाचा भरुदड सोसावाच लागतो.
ग्राहकाने कंपनीला कळविल्याशिवाय किंवा स्वत: एसएमएस केल्याशिवाय कोणताही योजना ग्राहकाला लागू होऊ नये, असा नियम असताना ग्राहकाला चकवून अनावश्यक योजना लादल्या जातात. एखाद्या योजनेचा एसएमएस पाठवून कंपन्या स्वत:च ‘एस’ किंवा ‘नो’ असे पर्याय पाठविते. ग्राहकाकडून चुकून किंवा लहान मुले मोबाईलशी खेळत असताना पर्यायचे बटन दाबले गेल्यास अनावश्यक योजनेसाठी मोठा भरुदड सोसावा लागतो. मोबाईल इंटरनेट सेवेबाबतही असे प्रकार घडत आहेत. नेटवरून एखादे डाऊनलोड सुरू असताना काही सेकंदाच्या अंतराने दोन एसएमएस पाठविले जातात. पहिला ‘एसएमएस’ मध्ये योजना सांगितली जाते व दुसऱ्या ‘एसएमएस’ मध्ये ही योजना लागू होऊन अमूक पैसे कापल्याचा उल्लेख असतो. हे दोन्ही ‘एसएमएस’ वाचेपर्यंत योजना लागू झालेली असते.
अशा विविध प्रकारांनी सध्या मोबाईल ग्राहकांना लुटले जात आहे. तक्रारींसाठी अनेकदा संबंधित मोबाईल कंपन्यांच्या कॉल सेंटरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होतो. मात्र, ही प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने अनेकजण तिथपर्यंत पोहचू शकत नाहीत. संपर्क झाल्यास अत्यंत गोड शब्दांमध्ये ग्राहकांची बोळवण केली जाते.