देशात ४० हजार ठिकाणी ‘वाय-फाय’-अनुपम श्रीवास्तव

मोबाइल यंत्रणेतील कॉलड्रॉप टाळण्यासाठी या वर्षांत देशभरात २१ हजार टॉवर उभारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे बीएसएनएलच्या ग्राहकांना इंटरनेटची चांगली सुविधा देण्यासाठी एकूण ४० हजार ठिकाणी वाय-फायची सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती, बीएसएनएलचे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बाजीराव रस्त्यावरील बीएसएनएलच्या कार्यालयात राज्यातील पहिल्या बिल पेमेंट एटीएमचे (बिल भरणा यंत्र)उद्घाटन श्रीवास्तव यांच्या हस्ते झाले. या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बीएसएनएल बोर्डाचे संचालक एन. के. गुप्ता, राज्याचे सरव्यवस्थापक जी. के. उपाध्याय ‘हिताची’ कंपनीचे लोनी अँटोनी आदी त्या वेळी उपस्थित होते.

श्रीवास्तव म्हणाले, की काही कारणांमुळे बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या मंदावली असली, तरी २००२ ते २००६ या काळात चांगली कामगिरी झाली. खासगी दूरसंचार कंपन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली. मात्र, ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी विभागांतर्गत गुंतवणुकीला प्राधान्य दिले. ग्राहकांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या. त्यातून आता ग्राहकांची संख्या वाढत आहे. जानेवारीपर्यंत २० लाख नवे ग्राहक मिळविले आहेत. देशामध्ये २०१५ पर्यंत २५ हजार मोबाइल टॉवर उभारण्यात आले.

या वर्षी २१ हजार टॉवर उभारण्याचे नियोजन आहे. वेगवान इंटरनेट सुविधा देण्यासाठी गेल्या वर्षी अडीच हजार ठिकाणी वाय-फाय यंत्रणा बसविली असून, आणखी ४० हजार ठिकाणी ही व्यवस्था बसविली  जाणार आहे.

बिल भरणा यंत्र कार्यान्वित

बाजीराव रस्त्यावरील बीएसएनएलच्या कार्यालयात बिल भरणा यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. मोबाइल, लॅन्डलाइन व ब्रॉडबॅन्ड सेवेच्या बिलावरील बारकोड या यंत्रावर स्कॅन करावे लागणार आहे. त्यानुसार दहा रुपयांच्या पटीमध्ये बिल भरता येईल. काही दिवसांनंतर केवळ ग्राहक क्रमांकाद्वारेही वीजबिल भरता येईल. ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता या यंत्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे.