‘शिक्षणसंस्थांनी तरूणाईच्या मानसिकतेशी जोडून घेतले पाहिजे, तरूणाईची भाषा समजून घेतली पाहिजे..’ हे तत्त्व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सध्या फारच मनावर घेतले आहे म्हणतात! विविध अडचणींना वारंवार तोंड देणाऱ्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ‘बन बेशरम.’चा सांगीतिक धडाही दिला जातोय म्हणे! विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या लँडलाईनवरील चित्रपट संगीताच्या कॉलर टय़ून्स सध्या विद्यार्थ्यांच्या चर्चेचा विषय झाल्या आहेत.
सध्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियांचे दिवस आहेत. त्यामुळे विद्यापीठांच्या शैक्षणिक विभागांचे दूरध्वनी सतत खणखणत असतात. मात्र, त्यातही भौतिकाशास्त्र विभागातील दूरध्वनी जास्तच वाजतो आहे. भौतिकशास्त्र या विषयाला अचानक मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळू लागला.. असे अजिबातच नाही. सध्या ‘हिट’ असणाऱ्या गाण्यांच्या कॉलरटय़ून्स विभागाच्या दूरध्वनीवर ऐकू येत आहेत. विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात फोन केल्यावर रूक्ष अशी रिंग ऐकू येण्याऐवजी ‘बेशरम’ चित्रपटातील ‘बन बेशरम.’, तर दुसऱ्या दूरध्वनी क्रमांकावर ‘जीने लगा हूँ.’ ही गाणी ऐकू येत आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळांवर विविध शैक्षणिक विभागांचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. त्यातील भौतिकशास्त्र विभागाच्या क्रमांकावर वाजणाऱ्या चित्रपट संगीताने विद्यार्थ्यांंचे मनोरंजन होत आहे. नक्की ‘विद्यापीठातच फोन लागला आहे ना.’ अशी शंका क्षणभर चाटूनही जाते. मात्र, त्याचेही उत्तर क्षणात मिळते. भौतिकशास्त्र विभागात फोन लागला असून तो फॉर्वर्ड करण्यात येत असल्याची टेपही वाजते. या कॉलरटय़ून्स सध्या विद्यार्थ्यांच्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेले विभागाचे हे जुने संपर्क क्रमांक आहेत. हे क्रमांक सुरू आहेतच, मात्र त्याचबरोबर नवे संपर्क क्रमांकही विभागाला देण्यात आले आहेत. मात्र, नवे क्रमांक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अद्ययावत करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दररोज हजारोंच्या संख्येने विभागाच्या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना आश्चर्याचे धक्के बसत आहेत.