सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून मूळ मालकाला दंड

पुणे शहरात सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांबाबत कारवाई केली जात आहे. त्यानुसार वाहनांच्या क्रमांकावरून मालकाच्या नावे दंडाच्या पावत्या पाठविण्यात येत आहेत. जुन्या वाहनाची विक्री केल्यानंतर त्याची हस्तांतरण प्रक्रिया न करणाऱ्या किंवा त्याकडे लक्ष न देणाऱ्या मूळ वाहन मालकांना आता दंडाचा भरुदड सहन करावा लागतो आहे. प्रामुख्याने दुचाकी वाहनांबाबत हा प्रकार मोठय़ा प्रमाणावर होत असून, हा भरुदड टाळण्यासाठी वाहन विक्रीनंतर हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक झाले आहे.

पुणे शहरात दुचाकींची संख्या कोणत्याही शहराच्या तुलनेत सर्वाधिक आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये हजार दुचाकी नोंदणी क्रमांकाची मालिका एका आठवडय़ात संपते. नवी वाहने खरेदी करण्याबरोबरच जुनी वाहने घेण्याचेही प्रमाण मोठे आहे. प्रामुख्याने नवी दुचाकी घेताना जुनी दुचाकी स्वीकारून त्याची किंमत नव्या वाहनाच्या किमतीतून कमी करण्याची योजना शहरात अनेक वितरकांकडून राबविली जाते. जुनी दुचाकी खासगी व्यक्तीला विकताना किंवा एखाद्या योजनेत वितरकाला देताना वाहन मालकाकडून आणि वितरकाकडूनही वाहनाच्या हस्तांतरण प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वास्तव सध्या समोर येत आहे.

जुनी दुचाकी खरेदी करताना खरेदीदाराकडून त्याची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्याकडे लक्ष दिले जात होते. वाहन आपल्या नावे करण्यासाठी ही प्रक्रिया संबंधित व्यक्ती तातडीने पूर्ण करीत होता. मात्र, सध्या वाहन विक्री करणाऱ्याने या प्रक्रियेकडे लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे. पुणे शहरातील जवळपास सर्वच चौकांमध्ये सध्या पोलिसांचे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. हेल्मेट न घालणारे, सिग्नल तोडणारे, सिग्नलला पादचारी पट्टय़ांवर वाहने उभे करणाऱ्यांच्या वाहनांचे छायाचित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून टिपले जाते. वाहनाच्या नोंदणी क्रमांकावरून संबंधित मालकाच्या पत्त्यावर दंडाची पावती पाठविली जाते. हा दंड कोणत्याही स्थितीत भरणे बंधनकारक आहे. अन्यथा, वाहन मालकावर कायदेशीर कारवाई केली जाते.

कोणतेही वाहन विकल्यानंतर त्याचे हस्तांतरण नव्या मालकाच्या नावे न झाल्यास अशा प्रकारचे वाहतूक पोलिसांचे दंड जुन्याच मालकाच्या पत्त्यावर येत आहेत. योजनेमध्ये नव्या दुचाकीसाठी जुनी दुचाकी वितरकाला दिल्यास हस्तांतरण शुल्क घेतले जाते. मात्र, बहुतांश वेळेला हस्तांतरण केले जात नसल्याचेही दिसून येत आहे.

नवी दुचाकी घेण्यासाठी जुनी दुचाकी वितरकाला दिली. सुमारे तीन वर्षांनतर या दुचाकीच्या क्रमांकावरून दंडाचा पावती आली. त्यामुळे याबाबत वितरकाकडे चौकशी केली असता वितरकाने दुचाकी विकली होती. पण, तिचे हस्तांतरण केले नसल्याची बाब समोर आली. दंडाचा भरुदड मूळ मालकाला बसत असल्याने हस्तांतरण प्रक्रियेकडे लक्ष देणे आवश्यक झाले आहे. -ज्योती आवटे, वाहनधारक