शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्याच्या उद्देशातून त्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्यासाठी ब्लू क्रॉस सोसायटी ऑफ पुणे संस्थेतर्फे सोमवारपासून (६ जुलै) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
६ जुलै या जागतिक झूनॉसिस दिनाचे औचित्य साधून महापालिका, आरोग्य विभाग, प्राणी कल्याण संस्था आणि नागरी संघटनांतर्फे शहरातील विविध भागांमध्ये भटक्या आणि पाळीव कुत्री आणि मांजरांसाठी रेबीज लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. केशवनगर-मुंढवा येथील जनावरांचे रुग्णालय, पुणे रेल्वे स्टेशन परिसर, प्रभाग क्रमांक २९, प्रभाग क्रमांक ५७ आणि प्रभाग क्रमांक ७० येथे तर, मंगळवारी (७ जुलै) पूना कॉलेजजवळील सर एन. एम. मेहता क्लिनिक येथे ही शिबिरे होणार आहेत. १२ जुलै रोजी बाणेर रस्त्यावीरल बाटा शोरूमजवळ, हांडेवाडी गावठाण, केळेवाडी, मुंढवा येथील लोणकर माध्यमिक विद्यालय येथे लसीकरण शिबिरे होणार आहेत, अशी माहिती ब्लू क्रॉस सोसायटी ऑफ पुणे संस्थेचे विजय परांजपे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिकेने भटकी कुत्री आणि मांजर यांची जनगणना करावी. त्यासाठी ब्लू क्रॉस सोसायटीला निधी उपलब्ध करून दिल्यास संस्था हे काम  करेल, असा प्रस्तावही महापालिकेला दिला असल्याचे परांजपे यांनी सांगितले.