नव्याने उदयास येणाऱ्या ‘भाई’ मंडळींकडून शहरात धुमाकूळ घालण्याच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांवर चौफेर टीका होऊ लागली, प्रसारमाध्यमांनीही झोडपून काढल्याने उशिरा जागे झालेल्या पोलिसांनी शुक्रवारी कारवाईचा ‘देखावा’ केला. पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाविद्यालयांवर धडक मोहीम राबवून टिंगलटवाळी करणाऱ्या ५८ टवाळखोरांना ताब्यात घेतले. या दोन्ही घटनांचा परस्परांशी संबंध नसल्याचा दावा करतानाच पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
चिंचवडच्या शाहूनगरची तोडफोडीची घटना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वादातून झाली होती. महाविद्यालयांच्या आवारात गुंड प्रवृत्ती असलेले तरुण जमा होतात आणि टिंगलटवाळी करतात, या माहितीचा आधार घेत सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सकाळपासून टवाळखोरांची धरपकड केली. त्यातील महाविद्यालयात नसलेल्या तरुणांवर कारवाई होईल आणि विद्यार्थी आहेत, त्यांच्या पालकांना बोलावून घेतल्याचे डॉ. तेली व विधाते यांनी पत्रकारांना सांगितले.
डॉ. तेली म्हणाले, शहरातील तोडफोडीच्या घटनांमधील आरोपींचा बंदोबस्त केला जाईल, फरार आरोपींना गजाआड केले जाईल. नव्याने ‘भाई’ निर्माण होणार नाहीत, याची खबरदारी घेऊ. शहराची लोकसंख्या वाढते आहे. बाहेरून येणाऱ्यांचा प्रमाण मोठे आहे. त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण नाही. अनेक गुन्ह्य़ांमध्ये अल्पवयीन मुले गुन्हेगार असतात. पोलिसांचा वचक नाही, असे म्हणण्याला काही अर्थ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.