गुढी पाडव्याच्या दिवशी पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराच्या प्रारंभाची सभा घेऊन राजकीय धुराळा उडवून दिल्यानंतर राज ठाकरे हे दीपक पायगुडे यांच्या प्रचारासाठी पुण्यात आणखी चार सभा घेणार आहेत. पायगुडे यांच्या उमेदवारीवर राज यांचे विशेष लक्ष असल्यानेच सभांचा हा चौकार मारण्यात येणार आहे. कोथरूड, पर्वती, कोंढवा व येरवडा या ठिकाणी या सभा घेण्यात येणार असून, राज यांच्यासह मनसेचे आमदार व शर्मिला ठाकरे याही पुण्यात प्रचारात उतरणार आहेत.
पाडव्याच्या दिवशी प्रचाराचा प्रारंभ करताना राज यांनी पुण्यात सभा घेतली. याच सभेनंतर ठाकरे विरुद्ध ठाकरे या वादाला पुन्हा तोंड फुटले. त्यानंतर दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. त्याचप्रमाणे माध्यमांतूनही त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रचाराची सुरुवात पायगुडे यांच्या प्रचारार्थ सभा घेऊन केल्यापासूनच पुण्यात विशेष लक्ष असल्याचे संकेत राज यांनी दिले होते. प्रचार ऐन रंगात आला असताना राज यांच्या पुणे लोकसभा मतदार संघात येणाऱ्या विविध विधानसभा मतदार संघांमध्ये सभा होणार आहेत.
मनसेचे शहराध्यक्ष व प्रचार प्रमुख प्रकाश ढोरे यांनी राज यांच्या सभांविषयी व शेवटच्या टप्प्यातील प्रचारही माहिती पत्रकार परिषदेत दिली. चार सभांपैकी दोन सभा ६ एप्रिलला होणार असून, पहिली सभा संध्याकाळी पाच वाजता कोंढवा बायपास येथील कापरे मळा येथे, तर दुसरी सभा संध्याकाळी सात वाजता येरवडा येथे मोझे हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. त्यानंतरच्या दोन सभा १४ एप्रिलला होणार असून, पहिली सभा संध्याकाळी पाच वाजता पर्वती येथे, तर दुसरी सभा संध्याकाळी सात वाजता कोथरूड येथे होणार आहे.
राज यांच्या सभांबरोबरच ८ एप्रिलला शर्मिला ठाकरे यांचा शिवाजीनगर व कसबा मतदार रोड शो होणार आहे. आमदार प्रवीण दरेकर, राम कदम व नितीन देसाई यांच्या ९ एप्रिलला गोखलेनगरसह इतर भागात सभांचे आयोजन करण्यात आले आहे.                                                                                                        

  • – कोथरूड, पर्वती, कोंढवा, येरवडय़ात होणार सभा
  • – दीपक पायगुडे यांच्या उमेदवारीवर विशेष लक्ष
  • – शर्मिला ठाकरे व मनसे आमदारांकडूनही पुण्यात प्रचार