विविध प्रांतामध्ये १९६० च्या दशकामध्ये रंगभूमीवर काय घडते या विषयीचे पडसाद सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उमटत होते. आता माहिती आणि दळणवळणाची साधने प्रगत झालेली असतानाही असे सांस्कृतिक पडसाद उमटताना दिसून येत नाहीत. प्रत्येक प्रांताची, भाषेची आणि मातीची ओळख आम्ही भारतीय म्हणून विसरायची गरज आहे काय, असा परखड सवाल प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी शुक्रवारी केला.
सरहद संस्थेतर्फे अमोल पालेकर यांच्या हस्ते ज्येष्ठ रंगकर्मी रतन थिय्याम यांना भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. भूपेन हजारिका यांचे पुत्र तेज हजारिका, ‘सरहद’ चे संजय नहार, युवराज शहा, भारत देसडला या वेळी व्यासपीठावर होते.
विजय तेंडुलकर, मोहन राकेश, बादल सरकार आणि गिरीश कर्नाड यांनी १९६० च्या दशकामध्ये रंगभूमीवर जे प्रयोग केले त्याचे सांस्कृतिक पडसाद लगेचच उमटत असत. त्यावेळी टेलिफोन तर दूरच, ट्रंककॉलद्वारे संपर्क साधावा लागत असे. अशा काळातही रंगभूमीच्या क्षेत्रात विविध प्रांतांमध्ये देवाणघेवाण होत असे याकडे लक्ष वेधून अमोल पालेकर म्हणाले, सध्या माहिती आणि दळणवळणाची साधने प्रगत झाली आहेत. गुगलवर सर्व माहिती एका झटक्यात मिळत आहे. असे असतानाही पूर्वीप्रमाणे सांस्कृतिक पडसाद उमटत नाहीत. देशातील प्रत्येक प्रांताची, भाषेची आणि मातीची ओळख आम्ही भारतीय म्हणून विसरत आहोत.
भूपेन हजारिका हे ‘दिल हुम हुम करे’ या हिंदूी गीतामुळे आपल्याला माहीत आहेत. जानू बरुआ यांची कारकीर्द माहीत नसली तरी ‘मैंने गांधी को नहीं मारा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून आपल्याला माहीत आहेत. रतन थिय्याम यांनी हिंदीमध्ये काहीच केले नसल्यामुळे दुर्दैवाने आपल्याला त्यांच्याविषयी पुरेशी माहितीदेखील नाही. रंगभूमीला भाषेचे बंधन नसते यावर थिय्याम यांचा विश्वास असल्यामुळेच ते हिंदीमध्ये झळकले नाहीत, असेही पालेकर म्हणाले.
भूपेन हजारिका यांच्यासमवेत काम केले असून जीवनातील अनुभवांविषयी आमच्यामध्ये अनेकदा संवाद झाला असल्याचे सांगून रतन थिय्याम म्हणाले, भूपेनदा मानवतावादी आणि परिवर्तनाचा ध्यास घेणारे परिपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. जगातील कोणत्याही विषयावर ते सहज संवाद साधत असत. भूपेनदा हे केवळ गायक नव्हते. तर, आसामच्या मातीचा गंध घेत येणारे असे त्यांचे गाणे होते.
तेज हजारिका यांनी आपल्या मनोगतातून पित्याच्या स्मृतींना उजाळा दिला. संजय नहार यांनी प्रास्ताविक केले. शैलेश वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले.