शरद पवार यांच्यावरही टीका

समाजामुळे तुम्ही आहात. तुमच्यामुळे समाज नाही. समाज जसा तुम्हाला डोक्यावर घेतो तसाच तो तुम्हाला पायाखालीही घेऊ शकतो, हे घूमजाव करणाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता बुधवारी टीका केली. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापरच अधिक होत आहे. त्यामुळे कायद्यात बदल न करता हा कायदा रद्दच झाला पाहिजे, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्यामुळे तो रद्द करण्याची मागणी सध्या सुरु आहे. त्यासाठी राज्यभर मराठा समाजाकडून मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा कायदा रद्द न करताना त्यामध्ये बदल करण्याची भूमिका घेतली आहे. या पाश्र्वभूमीवर उदयनराजे पुण्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी बोलताना थेट पवार यांच्यावरच टीका केली.

ते म्हणाले की, या कायद्याचा गैरवापरच अधिक होत आहे. त्यामुळे कायद्यात बदल न होता तो रद्दच झाला पाहिजे. या कायद्याअंतर्गत दाखल झालेले गुन्हे बोगस आहेत. कायद्याच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग होत आहे. निवडून येण्यासाठी लोकप्रतिनिधी समाजात तेढ निर्माण करतात. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावरून घूमजाव करणाऱ्यांनी आपण समाजामुळेच आहोत, हे लक्षात ठेवावे. समाज तुम्हाला डोक्यावर घेतो तसा तो तुम्हाला पायाखालीही घेऊ शकतो असे त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे सांगत येत्या ११ सप्टेंबर रोजी साताऱ्यात होणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.