लोणावळ्यातील हॉटेल कुमार रिसॉर्टमध्ये अल्पवयीन मुलीवर लंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याच्या घटनेचा तपास संथ गतीने सुरू आहे. घटनेचा निषेध नोंदवित तोडफोड करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी सूडबुद्धीने दरोडय़ाचे गुन्हे दाखल केले आहेत. या मनमानीपणाचा निषेध नोंदविण्यासाठी सोमवारपासून लोणावळ्यात बेमुदत बंद व उपोषण करण्यात येणार आहे, असे मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी जाहीर केले.
भेगडे म्हणाले, घटनेला पाच दिवस झाले तरी पोलिसांच्या हाती काहीच ठोस पुरावे लागलेले नाही. तपास सुरू आहे या व्यतिरिक्त पोलीस काहीच सांगत नाहीत. पाच दिवसात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोनशे कामगारांची चौकशी करण्यात आली. मात्र कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. हॉटेलमध्ये सुरक्षेची काहीच उपाययोजना नाही, त्यातच पोलिसांनी देखील संबंधित मुलगी हरवल्याच्या घटनेची गंभीर दखल न घेतल्याने त्या मुलीला जीव गमवावा लागला. त्यामुळे या प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवारी सकाळी जमलेल्या हजारों नागरिकांनी कुमार हॉटेलवर दगडफेक करीत तोडफोड केली.
पोलिसांनी या प्रकरणी सुमारे तीनशे जणांवर दरोडय़ाचा व पोलिसांना मारहाण करणे, मालमत्तेची तोडफोड करणे, असे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे दाखल करताना पोलिसांनी सुडबुद्धीने जाणीपूर्वक काही जणांची नावे गुन्ह्य़ात गोवली असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. हे गुन्हे तातडीने मागे न घेतल्यास सोमवारपासून लोणावळा बेमुदत बंद करण्यात येणार आहे.