News Flash

बंडखोरी टाळण्यासाठी यादी जाहीर करण्याची प्रक्रिया रद्द

महापालिका निवडणुकीसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया २७ जानेवारीपासून सुरू झाली.

पाचही प्रमुख पक्षांना बंडखोरीची भीती

उमेदवार घोषणेनंतर पक्षात होणारी बंडखोरी टाळण्यासाठी पाचही प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार यादी जाहीर करण्याच्या प्रक्रियेवर यंदाच्या निवडणुकीत फुली मारली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारी (३ फेब्रुवारी) दुपारी तीनपर्यंत मुदत आहे. बंडखोरीचा धोका लक्षात घेऊन काही उमेदवारांना उमेदवारी फॉर्म भरण्यास सांगण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी (२ फेब्रुवारी) तब्बल ४५४ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून देण्यात आली. यात काही विद्यमान नगरसेवकांनीही अर्ज सादर केले आहेत.

महापालिका निवडणुकीसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया २७ जानेवारीपासून सुरू झाली. पहिल्या काही दिवसांमध्ये अर्ज सादर करण्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. रखडलेली उमेदवारी यादी हे त्यामागील कारण असल्याचे बोलले जात होते. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात यादरम्यान युती-आघाडीचा खेळ सुरू होता. त्याबाबतचा निर्णय झाला की याद्या जाहीर होतील आणि उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग येईल, असे सांगण्यात येत   होते. मात्र युती संपुष्टात आल्यानंतर या दोन्ही पक्षांकडून याद्या जाहीर करण्यात आल्या नाहीत, तर शेवटच्या क्षणी आघाडी झाल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचेही उमेदवार निश्चित झालेले नाहीत.

अशी परिस्थिती असली तरी बंडखोरी टाळण्यासाठीच हा सावध पवित्रा पक्षांकडून घेण्यात आला आहे. ज्यांना उमेदवारी दिली जाणार आहे, त्यांना अर्ज भरण्यासही सांगण्यात आले आहे. त्यामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांबरोबरच काही पदाधिकाऱ्यांना उमेदवारी मिळाली असल्याची चर्चा समाजमाध्यमातून सुरू झाली होती. काही विद्यमान नगरसेवकांनीही त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अर्ज भरला असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत होते. मात्र अधिकृत यादी कोणत्याही राजकीय पक्षाकडून रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आली नव्हती.

उमेदवारी अर्ज भरण्यास वेग

उमेदवारी अर्ज भरण्याला गेल्या सहा दिवासांपर्यंत अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. बुधवापर्यंत (१ फेब्रुवारी) ५६ अर्ज निवडणूक विभागाकडे आले होते. अर्ज भरण्याची शेवटची मुदत ही शुक्रवारी (३ फेब्रुवारी) दुपारी तीनपर्यंत आहे. त्यामुळे अवधी कमी राहिल्यामुळे गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्यास गर्दी झाली. गुरुवारी दुपारी तीनपर्यंत ४५४ उमेदवारांनी अर्ज भरल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. उद्या यापेक्षाही मोठय़ा प्रमाणावर गर्दी होणार असल्याचेही स्पष्ट आहे. महापालिकेकडील आकडेवारीनुसार वारजे-कर्वेनगर आणि येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजे चाळीस अर्ज गुरुवारी दाखल झाले आहेत, तर नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडे ३७ अर्ज दाखल झाले आहेत. औंध येथे तीस, घोले रस्ता येथे ३४, कोथरूड येथून पंधरा, भवानी पेठेतून ३२, कसबा-विश्रामबागवाडा येथून २२, टिळक रस्ता येथून ३०, सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातून १४, बिबवेवाडी येथून ३६ तर धनकवडी, हडपसर आणि कोंढवा-वानवडी येथून अनुक्रमे २५, १७ आणि २६ अर्ज दाखल झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 3:15 am

Web Title: cancel the process to declare the list candidate in pune
Next Stories
1 निवडणूक साहित्याची आयोगाकडून दरनिश्चिती
2 इंजिन आले पळा पळा..
3 पिंपरीत ‘करो मतदान’चा संदेश १२ लाख मतदारांपर्यंत
Just Now!
X