बसगाडय़ांच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; रोज सरासरी हजारो फेऱ्या रद्द होत असल्याचे वास्तव

प्रवासी केंद्रित सेवा देत असल्याचा डंका पिटणाऱ्या पीएमपीच्या दररोज सरासरी साडेपाच हजार फेऱ्या रद्द होत असल्याची कबुली पीएमपी प्रशासनाने दिली आहे. यापूर्वी फेऱ्यांच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठीच उद्दिष्टात वाढ करण्यात आली असून फेऱ्या रद्द होत नसल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र आता ही कबुली देताना फेऱ्या रद्द होण्याचे खापर पीएमपीने अरुंद रस्ते आणि मेट्रोच्या कामामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीवर फोडले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील किमान आठ लाख प्रवाशांसाठी पीएमपी ही प्रमुख सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. नादुरुस्त आणि मोडकळीस आलेल्या गाडय़ा, घटत्या प्रवासी संख्येमुळे पीएमपीच्या उत्पन्नावरही परिणाम होत आहे. पीएमपीच्या अधिकाऱ्यांची निष्क्रियता त्याला कारणीभूत असल्याचा आरोप होत असतानाच पीएमपीच्या दररोज किमान साडेपाच हजार फेऱ्या विविध कारणांनी रद्द कराव्या लागत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आलो होते. विशेष म्हणजे पीएमपीच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट होत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने १३ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध केले होते.

ही बाब पुढे आल्यानंतर फेऱ्यांचे उद्दिष्ट आणि फेऱ्यांच्या संख्येत तफावत दिसत असली, तरी फेऱ्या रद्द होत नाहीत. हीच बाब गाडय़ा मार्गावर आणण्याबाबत आहे. मोठे उद्दिष्ट ठेवून तेथपर्यंत पोहोचण्याचा पीएमपी प्रशासनाचा प्रयत्न आहे. तफावत दिसत असली, तरी प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत नाही, असा दावा वाहतूक व्यवस्थापक सुनील गवळी यांनी केला होता. त्यानंतर पीएमपी प्रवासी मंचाचे सदस्य संजय शितोळे यांनी या संदर्भात पीएमपीकडे पत्रव्यवहार केला होता. त्याला उत्तर देताना पीएमपीने फेऱ्या रद्द होत असल्याची कबुली दिली आहे. पीएमपीच्या गाडय़ांची देखभाल दुरुस्ती योग्यप्रकारे होत नसल्याची माहिती सातत्याने पुढे आली आहे. देखभाल दुरुस्तीअभावी गाडय़ा रस्त्यातच नादुरुस्त होण्याचे, गाडय़ा मार्गावर बंद पडण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. पीएमपीच्या फेऱ्या रद्द होण्यामागे हेही एक प्रमुख कारण ठरत आहे. मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असून काही ठिकाणी उड्डाणपूल, रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू आहे. त्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातून वाहतूक कोंडी होत असून गाडय़ांना उशीर होत असल्यामुळे फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत.

नव्या गाडय़ा आल्यानंतर फेऱ्या वाढवणार

पीएमपीच्या एकूण ताफ्यापैकी १० वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान असलेल्या गाडय़ांची संख्या ४३६ अशी आहे. गाडय़ांचे आयुर्मान जास्त असल्यामुळे आणि त्या जुन्या झाल्यामुळे पूर्ण क्षमतेने फे ऱ्या करणे अडचणीचे होत आहे, असे पीएमपी प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान येत्या काही दिवसांत विजेवर धावणाऱ्या १५० गाडय़ा आणि नैसर्गिक वायूवरील ४०० गाडय़ा अशा एकूण ५५० गाडय़ा पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या गाडय़ा ताफ्यात आल्यावर गाडय़ांच्या फेऱ्या वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.

प्रतिदिन १६ हजार फेऱ्या रद्द

पीएमपीच्या ताफ्यात ८१९ डिझेलवर चालणाऱ्या आणि ५६३ सीएनजीवर चालणाऱ्या अशा स्वमालकीच्या १ हजार ३८२ गाडय़ा आहेत. भाडेतत्त्वावरील ६५३ सीएनजीवर चालणाऱ्या गाडय़ा पीएमपीने घेतल्या असून एकूण ताफ्यातील गाडय़ांची संख्या २ हजार ३५ आहे. या गाडय़ांपैकी १ हजार ६८५ गाडय़ा रस्त्यावर आणण्याचे उद्दिष्ट पीएमपी प्रशासनाकडून ठेवण्यात आले आहे. त्यापैकी सरासरी १ हजार ३४० गाडय़ा प्रत्यक्ष मार्गावर धावत आहेत. १ हजार ६८५ गाडय़ांच्या मदतीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात एकूण २२ हजार ४६ फेऱ्या दररोज नियोजित आहेत. मात्र त्यापैकी १६ हजारांहून थोडय़ा अधिक फेऱ्या कमी-अधिक फरकाने रद्द होत आहेत.