अनुच्छेद ३७० रद्द करून नरेंद्र मोदी सरकारने जगाला प्रखर संदेश दिला आहे. अनुच्छेद ३७० रद्द करणे हा अणू चाचणीप्रमाणेच महत्त्वाचा निर्णय आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी रविवारी व्यक्त केले.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३१९ व्या जयंतीनिमित्त थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार देशाचे माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. राजागोपाला चिदंबरम यांना सहस्रबुद्धे यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

खासदार गिरीश बापट, आमदार मेधा कुलकर्णी, उदय सिंह पेशवा, अनिरुद्ध देशपांडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे, अनिल गानू यावेळी उपस्थित होते.

सहस्रबुद्धे म्हणाले की, बाजीराव पेशवे यांच्या युद्धनीतीचा परदेशात अभ्यास केला जातो. मात्र आपल्याकडे वीरांची उपेक्षा होते. ती थांबविण्याची आवश्यकता आहे. वीरांचे स्मारक होणे, आठवण ठेवण्यासाठी कार्यक्रम आवश्यक असले तरी बाजीराव पेशवे यांच्या रणनीती अभ्यासाविषयी साक्षरता होणे अपेक्षित आहे. बाजीराव पेशवे यांचे चरित्र विविध भाषांत उपलब्ध व्हावे आणि त्यांचे स्मारक व्हावे यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आग्रही असून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल.

चिदंबरम म्हणाले, कोणत्याही देशाचा विकास हा संरक्षणाविना आणि संरक्षण हे विकासाविना होणे अर्थहीन आहे. देशाचा विकास  होत असला तरी सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क राहणे आवश्यक आहे.