13 July 2020

News Flash

मतदानानंतरही उमेदवारांची धावपळ सुरूच

पुण्यात मतदान तर झाले आहे पण ‘फीव्हर’ अजूनही तसाच आहे! उमेदवार, कार्यकर्ते आणि नागरिक कुणालाच मतदानानंतरही निर्धास्त होता आले नसल्याचेच चित्र आहे.

| April 19, 2014 03:25 am

कुणी दिवसभर कार्यकर्त्यांना आणि मतदार याद्यांमधील घोळामुळे मतदान न करता आलेल्यांना भेटून तक्रारी ऐकते आहे, कुणी विधान भवनावर उपोषणाला बसले आहे, तर कुणी या घोळाविषयी तावातावाने बोलून संताप व्यक्त करते आहे.. हा होता उमेदवार, कार्यकर्ते आणि काही पुणेकरांचाही मतदानाचा दुसरा दिवस!
एकदाचे मतदान पार पडले की एरवी उमेदवार निवांत होतात, कार्यकर्ते मोकळा श्वास घेतात आणि पक्ष कार्यालयेही लगबग सोडून आपल्या नेहमीच्या रूपात परत येतात. एकूणच मतदानाचा ‘फीव्हर’ ओसरतो. यंदा पुण्यात मतदान तर झाले आहे पण ‘फीव्हर’ अजूनही तसाच आहे! उमेदवार, कार्यकर्ते आणि नागरिक कुणालाच मतदानानंतरही निर्धास्त होता आले नसल्याचेच चित्र आहे.
आम आदमी पक्षाचे सुभाष वारे म्हणाले, ‘‘मतदान संपल्यावर सारे काही निवांत होईल असे वाटले होते. पण तसे न होता याद्यांमधील घोळामुळे आम्ही मतदान संपल्यानंतर विधान भवनावर आंदोलनासाठी गेलो. काल बूथवर फिरताना दिवसभर तक्रारीच ऐकायला मिळत होत्या. शुक्रवारचा दिवसही तक्रारींचाच आहे. मतदार आणि बूथ व्यवस्थापनासाठी थांबलेले कार्यकर्ते सगळेच येऊन त्यांच्या अडचणी सांगत होते. मतदारयादीतला घोळ हाच सगळ्या चर्चेचा विषय आहे.’’
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिल शिरोळे यांचा मतदानानंतरचा दिवस उपोषणात गेला. पक्षाचे पुणे शहर चिटणीस सुनील पांडे म्हणाले, ‘‘गुरुवारी मतदान संपल्यानंतर साडेसात वाजता उमेदवार विधान भवनावर जमले होते. ते रात्री अकराच्या सुमाराला घरी परतले. शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून शिरोळे विधान भवनमध्ये उपोषणालाच बसले होते.’’
उमेदवारांनी निवांत न होता शुक्रवारी विधान भवनाकडेच धाव घेतली. निवडणुकीतल्या पैसे वाटप प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने समर्थ पोलिस ठाण्यात आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन तात्पुरते स्थगित करून उमेदवार दीपक पायगुडे यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांसमवेत विधान भवन गाठले आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. शुक्रवारी संध्याकाळी काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम देखील विधान भवन येथे मतदार याद्यांमधील घोळाबद्दल निवेदन देण्यासाठी पोहोचले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2014 3:25 am

Web Title: candidate election tension voting complaint
Next Stories
1 अजित पवार यांनी पुन्हा दादागिरी!
2 मावळात सर्वाधिक मतदान उरणमध्ये
3 मतदान केंद्रं.. अजूनही शांत-निवांत!
Just Now!
X