भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पुण्यातून अनिल शिरोळे यांची उमेदवारी निश्चित केली असली, तरी शिरोळे यांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नसल्यामुळे उमेदवारीची घोषणा वरिष्ठ नेत्यांनी लवकरात लवकर करावी, अशी मागणी पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत. मात्र, पक्षातील चर्चेनुसार घोषणा व्हायला आणखी एक-दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.
निवडणुकीची तयारी सुरू करा, असे शिरोळे यांना शुक्रवारी पक्षनेतृत्वाकडून सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची घोषणा शनिवारी होईल, अशी आशा सर्वानाच वाटत होती. प्रत्यक्षात मात्र घोषणा व्हायची चिन्ह दिसत नाहीत हे लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली. पुण्यातून शहराध्यक्ष अनिल शिरोळे का आमदार गिरीश बापट ही चर्चा गेले पंधरा दिवस सुरू आहे. शिरोळे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे नक्की झाल्यानंतर ही चर्चा थांबली होती. मात्र, त्यांच्या उमेदवारीची घोषणा लांबल्यामुळे आता पुन्हा एकदा नक्की कोणाला उमेदवारी मिळणार ही चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या प्रचारतयारीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेस भवनात झालेली संयुक्त बैठक आणि त्या पाठोपाठ कदम यांचा जाहीर प्रचाराचा शनिवारी झालेला प्रारंभ यामुळे भाजपनेही लवकरात लवकर उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत असली, तरी घोषणा व्हायला आणखी एक-दोन दिवस लागतील, अशीही चर्चा आहे.