News Flash

कुंभमेळय़ाची विविध रूपे कुंचल्याद्वारे कॅनव्हासवर

सर्व चित्रकारांनी त्रिवेणी संगमावरील सांस्कृतिक कुंभ येथे चित्रकलेच्या माध्यमातून भरीव योगदान दिले.

(संग्रहित छायाचित्र)

विद्याधर कुलकर्णी

प्रयागराजला महाराष्ट्राची चित्रपताका फडकली

गंगा-यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावरील कुंभमेळा ही भारतीय संस्कृतीतील पवित्र आणि महत्त्वाची गोष्ट मानली जाते. कुंभमेळय़ाचे सांस्कृतिक वातावरण, आख्यायिका, साधू-संत आणि महंतांचे आखाडे या साऱ्या गोष्टी दहा चित्रकारांच्या कुंचल्याद्वारे कॅनव्हासवर अवतरल्या आणि प्रयागराज येथे प्रथमच महाराष्ट्राची चित्रपताका फडकली.

दर बारा वर्षांनी पवित्र कुंभ भरतो. तर, दर सहा वर्षांनी अर्धकुंभ भरते. यंदाचे अर्धकुंभ पर्व प्रयागराज येथे १५ जानेवारीपासून भरले आहे. उत्तर प्रदेशातील गंगा, यमुना व सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर भरलेले हे अर्धकुंभ ४ मार्चपर्यंत असेल. सांस्कृतिक अंगाने कुंभ समजावा या उद्देशातून देशाच्या विविध राज्यांतील कलाकारांकडून वेगवेगळय़ा सांस्कृतिक उपक्रमांचे सादरीकरण होत आहे. ‘सांस्कृतिक कुंभ’मध्ये दिल्लीच्या राष्ट्रीय ललित कला अकादमीतर्फे विविध राज्यांची चित्रकार्यशाळा आयोजित केली आहे. या चित्र कार्यशाळेचा श्रीगणेशा करण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे.

या चित्रकार्यशाळेमध्ये राज्याच्या वेगवेगळय़ा भागांतील युवा, अनुभवी आणि व्यावसायिक अशा दहा चित्रकारांना प्रयागराज येथे निमंत्रित करण्यात आले होते. पुण्यातील अजय देशपांडे, रामचंद्र खरटमल, विनायक पोतदार, ओंकार पवार, नागेश टोके, सोलापूर येथील संजय नूरा, तुळजापूर येथील दिग्विजय कुंभार, कल्याण येथील मंदार उजाळ, कर्जत येथील रामदास लोभी आणि सातारा येथील विजयकुमार धुमाळ यांचा त्यामध्ये समावेश होता. या सर्व चित्रकारांनी त्रिवेणी संगमावरील सांस्कृतिक कुंभ येथे चित्रकलेच्या माध्यमातून भरीव योगदान दिले.

कुंभमधील वातावरण, कुंभविषयीच्या आख्यायिका तसेच सांस्कृतिक महत्त्व, साधू-संत आणि महंतांचे आखाडे याची अनुभूती घेत प्रत्येकाने तीन चित्रकृती साकारल्या. त्याचबरोबर साधू आणि महंतांना समोर बसवून प्रत्यक्ष व्यक्तिचित्रणे सादर केली. ललित कलेच्या अशा उपक्रमामुळे विविध राज्यांच्या कलात्मक संस्कृतीची देवाणघेवाण होते. याच उद्देशाने राष्ट्रीय ललित कला कादमीतर्फे ‘व्यक्तिचित्रण आणि चित्रचित्रण कार्यशाळा २०१९, सांस्कृतिक कुंभ प्रयागराज’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांनी दिली. प्रा. रमेश भोसले यांनी या कार्यशाळेच्या संयोजनाचे काम पाहिले. मराठी चित्रकारांच्या कुंचल्यातून साकारलेला कुंभमेळा ४ मार्चपर्यंत प्रयागराज येथे प्रदर्शनाद्वारे मांडण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2019 4:00 am

Web Title: canvas on various forms of kumbh mela form
Next Stories
1 ५२ लाख लोकसंख्या सिद्ध करण्याचे आव्हान
2 ‘शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थे’ची स्थापना
3 घर भाडय़ाने देताना खातरजमा करा!
Just Now!
X