स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळातील पुण्याच्या इतिहासातील क्रांतिकारी घटना

‘चले जाव’ चळवळीच्या सुरुवातीलाच संपूर्ण देश हादरवून सोडणाऱ्या पुण्यातील ‘कॅपिटल’ बॉम्बस्फोटाच्या घटनेला बुधवारी (२४ जानेवारी) पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळातील या क्रांतिकारी घटनेचा इतिहास इतिहासप्रेमी मंडळ आणि हिंदू तरुण मंडळ ट्रस्टतर्फे जागविण्यात येणार आहे. त्याकाळी कॅपिटल या नावाने प्रसिद्ध असलेली ही चित्रपटगृहाची वास्तू आता व्हिक्टरी या नावाने त्याच दिमाखात उभी आहे.

pune digitization, digitization social and political documents pune
पुण्यातील दीडशे वर्षांच्या सामाजिक-राजकीय दस्तऐवजाचे ‘डिजिटायझेशन’; पुणे सार्वजनिक सभेचा पुढाकार, निधीची मात्र चणचण
Kailash Gahlot ED custody
अरविंद केजरीवालांनंतर आता आपच्या आणखी एका मंत्र्याच्या मागे ईडीचा ससेमिरा; कोण आहेत कैलाश गेहलोत?
raghav chadha british mp meeting
खलिस्तान समर्थकाच्या भेटीमुळे राघव चड्ढा वादाच्या भोवऱ्यात
citizenship question in the constituent assembly constituent assembly debate on
चतु:सूत्र : नागरिकतेचा पैस

चले जाव चळवळीच्या कालखंडात पुण्यातील बाबुराव चव्हाण, बापू साळवी, एस. टी. कुलकर्णी या भूमिगत कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन इंग्रजांच्या जुलमी सत्तेला हिसका दाखविण्यासाठी जोरदार धमाका करण्याचा निश्चय केला. भास्कर कर्णिक या तरुणाने खडकी येथील दारुगोळा कारखान्यातून (अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी) बॉम्ब बाहेर आणण्याचे काम केले. त्या बॉम्बचे टाईम बॉम्बमध्ये रूपांतर करताना बापू डोंगरे आणि निळूभाऊ लिमये जखमी झाले. त्यानंतर रामसिंग परदेशी, हरिभाऊ लिमये आणि दत्ता जोशी मदतीला धावले. या क्रांतिवीरांनी २४ जानेवारी १९४३ रोजी कॅपिटल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट घडविला. त्यामध्ये चार इंग्रज अधिकारी ठार झाले. तर, १८ जण जखमी झाले. त्यामुळे खवळलेल्या इंग्रजांनी धरपकड सुरू केली. त्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असून त्याचे स्मरण करण्यासाठी बुधवारी व्हिक्टरी चित्रपटगृहाजवळ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी दिली.

कॅपिटल खटल्यातील अखेरचा दुवा असलेले स्वातंत्र्यसेनानी हरिभाऊ लिमये यांचे गेल्या वर्षी जानेवारीमध्येच निधन झाले. त्यामुळे या घटनेचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना हरिभाऊंची अनुपस्थिती सर्वानाच जाणवणार आहे. श्रीकृष्ण लिमये आणि माजी महापौर निळूभाऊ लिमये हे हरिभाऊंचे ज्येष्ठ बंधू होत. १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीने हरिभाऊंना झपाटून टाकले होते. इंग्रज सरकारच्या अत्याचार आणि दडपशाहीला निरपराध नागरिक आणि स्त्रिया बळी पडल्या होत्या. त्यावेळी अवघ्या १६ वर्षांचे असलेल्या हरिभाऊंच्या मनात याबद्दल संतापाची आग धगधगत होती. तरुणांनी छावणी परिसरातील कॅपिटल, एम्पायर, वेस्टएन्ड या चित्रपटगृहांत बॉम्बस्फोट करण्याचे ठरवले तेव्हा हरिभाऊंनी त्यांना साथ दिली. इंग्रज अधिकारी, कर्मचारी तेथे मोठय़ा संख्येने सिनेमा बघायला येत असत. त्या वेळी पोलीस समोर येताच त्यांनी बॉम्बच्या रसायनाची बाटली खिशात घातली होती. ती खिशातच सांडली आणि मांडी भाजून निघाली तरी सहकारी पकडले जातील म्हणून हरिभाऊंनी तोंडातून अवाक्षरही काढले नाही. नंतर पोलिसी हिसका दाखवूनही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची नावे गुप्त ठेवली. तुरुंगातून सुटका झाल्यावर, देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी एल. एल. बी. पदवी संपादन केली. वकिलीबरोबरच वडिलांचे मसाज उपचाराचे सेवाव्रतही त्यांनी जीवनाच्या अखेपर्यंत सुरू ठेवले. समाजवादी चळवळीचा संस्कार, महात्मा गांधी, अच्युतराव पटवर्धन, राम मनोहर लोहिया, साने गुरुजी यांच्या प्रभावामुळे ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आघाडीवर होते, तर आणीबाणीत तुरुंगात डांबलेल्या कार्यकर्त्यांचे वकीलपत्र घेऊन त्यांनी अनेकांची सुटका केली. चळवळी आणि कार्यकर्त्यांचे आधारवड असलेल्या हरिभाऊंनी आपली बुद्धी, धन, जागा यांची मुक्तहस्ते मदत केली. वंचितांसाठी कार्यरत संस्थांना ते ठरावीक तारखेला न चुकता देणगीचा धनादेश पाठवत असत. मात्र, कॅपिटल बॉम्बस्फोटाचा अमृतमहोत्सव पाहण्याचे भाग्य त्यांना दुर्दैवाने लाभले नाही, असेही शेटे यांनी सांगितले.  व्हिक्टरी चित्रपटगृहाच्या प्रवेशद्वाराशी बुधवारी सकाळी साडेदहा वाजता भव्य रंगावलीद्वारे हा इतिहास पुन्हा साकारण्यात येणार आहे.