विद्याधर कुलकर्णी

गनिमी कावा युद्धतंत्राचा वापर करून सिल्व्हासा मुख्यालयावर फडकणारा पोर्तुगीजांचा राष्ट्रध्वज हस्तगत करत तो जतन करून ठेवल्याच्या पुण्यातील स्वातंत्र्यसेनानींच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. दादरा नगर हवेली प्रांताला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देऊन सिल्व्हासाची राजधानी म्हणून घोषित केल्याच्या घटनेला मंगळवारी (११ ऑगस्ट) ६० वर्षे पूर्ण होत आहेत.

पोर्तुगीजांनी सहजासहजी हा प्रदेश हस्तांतरित केला नाही, तर त्यासाठी झालेल्या संघर्षांमुळेच हा प्रदेश भारतात समाविष्ट झाला. या लढय़ात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ग्राहक पंचायतचे संस्थापक बिंदुमाधव जोशी, राजाभाऊ वाकणकर या तीन पुणेकरांसह ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके यांनी स्वातंत्र्यसेनानी म्हणून सहभाग घेतला होता.

‘शत्रुपक्षाचा ध्वज मिळविणे म्हणजेही विजय संपादन करणे’ या युद्धसंकल्पनेच्या नियमाचा आधार घेत सिल्व्हासा येथून आंदोलकांनी ताब्यात घेतलेला ध्वज ताब्यात मिळावा ही पोर्तुगाल सरकारची मागणी फेटाळली, अशी आठवण या मुक्ती संग्रामातील बिनीचे शिलेदार बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितली.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील ७० गावांचा भूप्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात होता.  तो मुक्त करण्यासाठी राजाभाऊ वाकणकर यांनी पुढाकार घेतला. सिल्व्हासाचे मुख्यालय आम्ही २ ऑगस्ट १९५४ रोजी ताब्यात घेतले आणि ‘भारतमाता की जय’ घोषणा देत मुख्यालयासमोर १८५ वर्षे फडकणारा ध्वज ओढून खाली काढला गेला. त्वेषाच्या भरात हा ध्वज फाटलाही असता. पण, पोर्तुगीजांवर मिळविलेल्या विजयाचे चिन्ह आहे याचे भान राखत बिंदुमाधव जोशी यांनी हा ध्वज खाली खेचल्यानंतर सुरक्षितपणे जतन केला, असे पुरंदरे यांनी सांगितले.

‘दिव्याच्या अवसेला स्वातंत्र्याचा सूर्योदय’

छत्रपती शिवाजी महाराजाच्या गनिमी कावा युद्धतंत्राचा वापर करून २ ऑगस्ट १९५४ रोजी मोजक्या कार्यकर्त्यांपैकी एकालाही न गमावता ही लढाईजिंकली होती. त्या दिवशी दिव्याची अमावस्या होती. दिव्याच्या अवसेला स्वातंत्र्याचा सूर्योदय पाहिला, अशी भावना बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली.‘सशस्त्र क्रांतीची अपेक्षा ठेवून होतो त्यामध्ये तुम्ही यशस्वी झालात ही भाग्याची गोष्ट आहे’, अशा शब्दांत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आमची पाठ थोपटली होती, असेही पुरंदरे यांनी सांगितले.