चोरटय़ाकडून तीन मोटारी जप्त; गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई

यूट्युबवरील चित्रफीत पाहून कोल्हापुरातून मोटारी चोरणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली. त्याच्याकडून तीन मोटारी आणि पाच मोबाइल संच जप्त करण्यात आले.

रेवण सोनटक्के (वय २०, रा. महंमदवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. खडकीतील मुळा रोड भागात एक आलिशान मोटार रस्त्याच्या कडेला थांबली होती. संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाच्या उत्तर विभागातील पोलीस निरीक्षक अंजुम बागवान आणि त्यांचे पथक खडकी भागात गस्त घालत होते. रस्त्याच्या कडेला थांबलेली आलिशान मोटार पाहून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी मोटारचालक सोनटक्केकडे चौकशी केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशीत त्याने कोल्हापुरातून मोटार चोरल्याची कबुली दिली. सोनटक्केला ताब्यात घेण्यात आल्यानंतर तपासात त्याने कोल्हापूर आणि सांगली भागातून आणखी दोन मोटारी चोरल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच्याकडून पाच मोबाइल संच जप्त करण्यात आले.  पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

‘गाडी चुराने का तरीका’

काही दिवसांपूर्वी आरोपी रेवण सोनटक्के याने यूटय़ूबवर ‘गाडी चुराने का तरीका’ ही चित्रफीत पाहिली होती. आलिशान मोटारी गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी दिल्यानंतर मेकॅनिक गाडीची चावी गॅरेजमध्ये ठेवायचा. सोनटक्के गाडी दुरुस्तीच्या बहाण्याने गॅरेजमध्ये गेल्यानंतर चावी चोरायचा. त्यानंतर मध्यरात्री गॅरेजबाहेर दुरुस्तीसाठी लावलेली मोटार तो चोरलेल्या चावीचा वापर करून चोरायचा. त्याने चोरलेल्या मोटारीचा नगर रस्त्यावर अपघात झाला होता. अपघातग्रस्त मोटार तो रस्त्याच्या कडेला सोडून पसार झाला होता.