निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची निवासाची व्यवस्था

पुणे : पुण्याच्या आसपासच्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक किल्ले, टेकड्या, दुर्गम भाग, वनसंपदा, ऐतिहासिक वारसास्थळे, लेणी आणि धरणे अशी अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत. यातील अनेक ठिकाणी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसर असल्याने पक्के   बांधकाम करता येत नाही. परिणामी हॉटेल वा निवासस्थानांच्या सोयी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. अशा ठिकाणी कॅराव्हॅन व कॅ म्परव्हॅनच्या साहाय्याने पर्यटकांना निवासाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

याबाबतचे धोरण राज्य शासनाने तयार केले असून गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे व परिसराला वैविध्यपूर्ण निसर्गसौंदर्य लाभले आहे. या ठिकाणी कॅ राव्हॅन पर्यटनासाठी मोठा वाव आहे. दुर्गम भागात हॉटेल, निवासस्थानांसारख्या राहण्याच्या सोयी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. अशा ठिकाणी तसेच ज्या क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी बांधकामासाठी प्रतिबंध घालण्यात आले आहेत, अशा ठिकाणी कॅराव्हॅन व कॅम्परव्हॅनच्या साहाय्याने पर्यटकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देता येणार आहेत.

याबाबत बोलताना पुणे विभागाच्या पर्यटन उपसंचालक सुप्रिया करमरकर- दातार म्हणाल्या, की पर्यटन संचालनालयाकडे कॅ राव्हॅन व कॅ राव्हॅन पार्कची नोंदणी आवश्यक राहील. संबंधित व्यावसायिकांना पर्यटन संचालनालयामार्फत विपणन, स्वच्छता, व्यवस्थापन यांचे प्रशिक्षण दिले जाईल. या पर्यटन संकल्पनेमुळे पर्यटकांना राहण्याची सुविधा तसेच खासगी गुंतवणुकीसही प्रोत्साहन मिळेल. कौटुंबिक सहलींचे आयोजन, हॉटेल आणि निवासस्थान व्यवस्थेपेक्षा वेगळा अनुभव, ना विकास क्षेत्राचा योग्य वापर, दुर्गम भागातील पर्यटनाला चालना देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे यामुळे शक्य होणार आहे.

पुण्यातील धरणांचे पाणलोट क्षेत्राजवळील जागा, डोंगरमाथे, गडांचे पायथे या जागांचा वापर कॅ राव्हॅन पर्यटनासाठी करता येऊ शके ल. धोम धरणाचे पाणलोट क्षेत्र, कोल्हापूर जवळचे मसाई पठार, जावळी खोरे, वेल्हे तालुक्यातील गडांचे पायथे, कामशेत, मुळशी धरणाचे पाणलोट क्षेत्र या ठिकाणी पर्यटनाला अधिक वाव आहे. या ठिकाणी कॅ राव्हॅनच्या माध्यमातून पर्यटकांची निवासव्यवस्था होऊ शकणार आहे.           – सुप्रिया करमरकर-दातार, उपसंचालक, पर्यटन संचालनालय