सध्याच्या काळात विद्यार्थी आणि पालक आपला सामाजिक दर्जा वाढावा, या हेतूने करिअर क्षेत्र निवडताना दिसतात. दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअर निवडीचे अनेक उत्तम मार्ग आहेत. तर स्पर्धा परीक्षांमध्ये केवळ एमपीएससी आणि यूपीएससी याच नाहीत, तर इतरही अनेक संधी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ सामाजिक दर्जा पाहून नाही, तर स्वत:मधील क्षमता ओळखून आवडणारे व झेपणारे क्षेत्र निवडायला हवे. तसे केल्यास प्रत्येकाला यश नक्की मिळेल, असे मत करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले.

िलगायत सेवा मंडळ या शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीने दहावी आणि बारावी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरामध्ये ते बोलत होते. या वेळी मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय वायचळ, कार्याध्यक्ष युवराज गाडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

वेलणकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी क्षमता ओळखून करिअरसाठीचे क्षेत्र निवडले पाहिजे. त्याकरिता स्वत:ची अभियोग्यता चाचणी महत्त्वाची आहे. ज्यामुळे करिअर क्षेत्र निवडणे सोपे होईल.

जे क्षेत्र निवडले आहे, त्याचे फायदे-तोटे ओळखा, त्या क्षेत्रातील पुढील संधी जाणून घ्या. त्याच बरोबर तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना भेटून क्षेत्राची माहिती करून घ्या. ज्यामुळे त्या क्षेत्राची सखोल माहिती होईल.

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वेलणकर यांनी सांगितले, की स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त यूपीएससी-एमपीएससी नाही. केवळ यूपीएससी-एमपीएससी म्हणजेच करिअर नाही. स्पर्धा परीक्षा अनेक क्षेत्रातील आहेत, त्या परीक्षा देऊनही तुम्ही करिअर करू शकता. आपण किती तास अभ्यास करतो त्यापेक्षा ठरलेल्या वेळात काय अभ्यास करतो हे महत्त्वाचे आहे.

पूर्ण समर्पण करून एकाग्रतेने अभ्यास करा. यश सगळ्यांना मिळू शकते परंतु त्याकरिता कष्ट करणे महत्त्वाचे आहे. अनिल रुद्रके, योगेंद्र मेणकर, श्रीकांत तोडकर, दिगंबर केंजळे, रवींद्र महाजन, नरेंद्र मोटे, नरेंद्र सोलापुरे, शैलेश भादुले, अरुण मिटकरी, सुनील कसबेकर, विलास हापसे, रवींद्र तांबेकर, राजू खंडागळे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.