23 November 2017

News Flash

विविध चौकटींच्या परिणामामुळे संगीत मुक्त नाही

शास्त्रीय संगीत हे काही पुतळा किंवा चित्राप्रमाणे दिसत नाही. मात्र, ते दिसत नसले तरी

प्रतिनिधी, पुणे | Updated: July 16, 2017 4:26 AM

कर्नाटक शैलीचे प्रसिद्ध गायक आणि विचारवंत टी. एम. कृष्णा

टी. एम. कृष्णा यांचे मत

सर्जनशील कलांमध्ये अमूर्त असलेल्या शास्त्रीय संगीतावर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि सौंदर्यशास्त्र अशा विविध चौकटी या परिणाम करीत असतात. चौकटीमध्ये बांधले गेलेले संगीत आणि ते संगीत सादर करणारा कलाकार मुक्त राहू शकत नाही, असे मत कर्नाटक शैलीचे प्रसिद्ध गायक आणि विचारवंत टी. एम. कृष्णा यांनी शनिवारी व्यक्त केले.

‘मी मुक्त आहे काय?- एका संगीतकाराचा शोध’ या विषयावर टी. एम. कृष्णा यांनी यंदाचे प्रा. राम बापट स्मृती व्याख्यान सत्र गुंफले. संगीत म्हणजे काय येथपासून ते संगीतावर परिणाम करणाऱ्या वेगवेगळ्या चौकटी याबाबत कृष्णा यांनी विवेचन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले ज्येष्ठ समीक्षक सदानंद मेनन यांनी कृष्णा यांच्याशी संवाद साधला.

शास्त्रीय संगीत हे काही पुतळा किंवा चित्राप्रमाणे दिसत नाही. मात्र, ते दिसत नसले तरी असते. संगीत अमूर्त असल्याने ते कळणेदेखील अवघड आहे, याकडे लक्ष वेधून कृष्णा म्हणाले, संगीत दैवी असते असे म्हणतात. पण दैवी म्हणजे काय हेही समजत नाही. संगीत शुद्ध असते हे खरे असेल तर मग ते प्रदूषित कोण करते हाही प्रश्नच आहे. संगीत हा गायक मुख्य कलाकार असलेला एक रंगमंचीय आविष्कार असतो. संगीताची रचना ठरलेली असेल तर संगीतातील गांभीर्य अबाधित ठेवून स्वातंत्र्य घ्यायचे म्हणजे काय असते. त्यामुळे मी का गातो हा मूलभूत प्रश्न मला सतावत असतो. मैफिल गाजविणे म्हणजे स्वत:ची शुद्ध फसवणूक असते. कोणत्या आलापीला टाळ्या मिळतात याचा आडाखा बांधून गायन केले जाते. या सगळ्या गोष्टींचे कलात्मक दु:ख होते आणि कधी कधी नैराश्यही येते. टाळ्यांची दाद डोक्यात ठेवून केले जाणारे गायन ही एक समस्या आहे. परंपरा ही श्रद्धा आहे. त्यामुळे परंपरेला प्रश्न विचारायचे नसतात.

हरिकथा परंपरेतून आलेले भजनी संगीत हे कर्नाटक शैलीच्या गायनाचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे त्यागराज यांच्या भक्तिरचना मैफिलीमध्ये सादर होऊ लागल्या, असे सांगून कृष्णा म्हणाले, शब्दांचे अर्थ समजले म्हणजे त्यांचा भाव गायनामध्ये येतो का असा प्रश्न आहे. लग्नात आणि देवळात सादर होणाऱ्या गायनामुळे कर्नाटक शैली हा ब्राह्मणीकरण झालेला कलाप्रकार आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धर्म-जात-िलग भेदभावाचा कर्नाटक संगीतावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मी मुक्त आहे का हे कलाकाराने स्वत:ला विचारले पाहिजे.

प्रसिद्ध नाटककार मकरंद साठे यांनी कृष्णा यांचा परिचय करून दिला. परिमल चौधरी यांनी प्रास्ताविक केले. अभिनेते गजानन परांजपे यांनी स्वागत केले.

First Published on July 16, 2017 4:26 am

Web Title: carnatic music vocalist tm krishna attended prof ram bapat memorial lecture sessions