पिंपरी-चिंचवडमध्ये चारचाकी वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. दुचाकी वरून आलेल्या तिघांच्या टोळक्याने रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांना लक्ष्य करत दगडाने काचांची तोडफोड केली. या घटनेत पाच ते सहा वाहनांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अनभिज्ञ असून काही माहितीच नाही तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांचा फोनही बंद येत आहे.

पिंपरी गावठाण येथील वाघेरे कॉलनीत अज्ञात टोळक्याने दगडाने वाहनांची तोडफोड केली आहे. ही घटना मध्यरात्री घडली असून या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी डोळेझाक केली आहे. दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी आरडाओरडा करत रस्त्यावर दिसेल त्या वाहनाला लक्ष्य करत दगडाने तोडफोड केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. वाहन पार्क करायची का नाही असा सवाल नागरिक करत आहेत. या घटनेत ऐकून पाच ते सहा चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. अद्याप घटनास्थळी पोलीस दाखल झालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.