16 October 2018

News Flash

मंगेश तेंडुलकर यांच्या व्यंगचित्रांचे पंचाहत्तरावे प्रदर्शन २ ते ४ मे दरम्यान

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी रेखाटलेल्या विविध व्यंगचित्रांचे ७५ वे (अमृत महोत्सवी) प्रदर्शन येत्या २ ते ४ मे या काळात भरवण्यात येणार आहे.

| April 25, 2015 03:10 am

विविध समस्या, समाजातील व्यंग, व्यक्ती, प्रसंग यांच्यावर आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून भाष्य करणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी रेखाटलेल्या विविध व्यंगचित्रांचे ७५ वे (अमृत महोत्सवी) प्रदर्शन येत्या २ ते ४ मे या काळात भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन २ मे रोजी सकाळी १० वाजता ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार आहे. बालगंधर्व कलादालनात भरणारे हे प्रदर्शन सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत सर्वासाठी खुले असणार आहे.
व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तेंडुलकर म्हणाले, की आपण १९९६ पासून व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवत आहोत. अशा प्रकारचे हे पंच्याहत्तरावे प्रदर्शन असेल. प्रत्येक प्रदर्शनात ३० नवीन व्यंगचित्रांचा समावेश करत असतो. त्याप्रमाणे यंदाच्या प्रदर्शनात दोनशेहून अधिक व्यंगचित्रं असणार आहेत. त्यातील तीन-चतुर्थाश व्यंगचित्रं नवीन आहेत. यामध्ये आपले आवडते चित्रकार, लेखक यांची आपण स्वत: काढलेली कॅरिकेचर्स यांचाही समावेश असणार आहे. पॉकेट कार्टून, कॅप्शनलेस चित्रं या व्यंगचित्रांची मालिकाही प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे.
या प्रदर्शनाचे आणखीएक वैशिष्टय़ म्हणजे, व्यंगचित्राच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवीन चित्रकारांना या प्रदर्शनात स्वत: मंगेश तेंडुलकर हे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी ४ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० या दरम्यानचा वेळ राखून ठेवण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

First Published on April 25, 2015 3:10 am

Web Title: cartoon exhibition 2