यंगचित्रे, हास्यचित्रे, अर्कचित्रे, कॉमिक स्ट्रपिं अशी वेगवेगळ्या प्रकारांतली व्यंगचित्रे एकाच ठिकाणी बघण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. ‘कार्टूनिस्ट कम्बाइन’ या व्यंगचित्रकारांच्या संघटनेतर्फे २८ फेब्रुवारी ते २ मार्चदरम्यान बालगंधर्व कलादालनात ‘हास्यरेषा’ या व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील तब्बल ७५ व्यंगचित्रकारांची ४०० व्यंगचित्रे या प्रदर्शनात पाहता येतील.
२८ तारखेला (शनिवारी) सकाळी ११ वाजता ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती व्यंगचित्रकार घन:श्याम देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. व्यंगचित्रकार चारुहास पंडित, वैजनाथ दुलंगे, खलील खान, लहू काळे या वेळी उपस्थित होते.
विविध राजकीय व सामाजिक विषयांवरील व्यंगचित्रांचे केवळ प्रदर्शनच नव्हे तर ती कशी काढली जातात याची प्रात्यक्षिकेही प्रदर्शनस्थळी रसिकांना बघायला मिळतील. प्रभाकर वाईरकर, वैजनाथ दुलंगे, चारुहास पंडित, खलील खान, घन:श्याम देशमुख, नीलेश जाधव, भटू बागले, बीजय बीसवाल, सतीश उपाध्ये, विनय चानेकर, संजय मोरे, भरत जगताप हे बारा व्यंगचित्रकार ही प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. इतकेच नव्हे तर येणाऱ्या रसिकांना व्यंगचित्रकारांकडून स्वत:ची अर्कचित्रे काढून घेण्याची संधीही मिळेल. चित्रकलेच्या तसेच अॅनिमेशनच्या विद्यार्थ्यांनाही या निमित्ताने व्यंगचित्रकारांशी संवाद साधता येईल, असेही संयोजकांनी सांगितले.