गालावर खुदकन हसू आणणारे.. अंतर्मुख करायला लावणारा विचार मांडणारे.. राजकीय घडामोडींवर मार्मिक टिप्पणी करणारे.. अशा विविध विषयांवरील व्यंगचित्रांचा खजिना गुरुवारी कलाप्रेमी नागरिकांसाठी खुला झाला. काही वर्षांपूर्वी चितारलेली ही व्यंगचित्रे आजही तेवढीच ताजी आहेत याची प्रचिती हे प्रदर्शन पाहणाऱ्या रसिकांना आली.
जागतिक व्यंगचित्रकार दिनाचे औचित्य साधून कार्टूनिस्ट कंबाइन संस्थेतर्फे बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालन येथे भरविण्यात आलेल्या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन जगताप यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, ज्येष्ठ शिल्पकार आणि अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिनकर थोपटे, महापालिकेतील शिवसेना गटनेते अशोक हरणावळ, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, महापालिकेच्या वारसा वास्तू विभागाचे प्रमुख श्याम ढवळे, संस्थेचे अध्यक्ष चारुहास पंडित, प्रशांत कुलकर्णी आणि वैजनाथ दुलंगे या वेळी उपस्थित होते. हे प्रदर्शन रविवापर्यंत (८ मे) सकाळी साडेदहा ते रात्री साडेआठ या वेळात खुले राहणार आहे. यानिमित्ताने प्रसिद्ध व्यंगचित्रकार दररोज व्यंगचित्रकलेची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत.
राजकीय उलथापालथ करण्याबरोबरच समाजाला योग्य मार्गावर नेण्याची ताकद व्यंगचित्रांमध्ये असते, असे सांगून जगताप म्हणाले,की बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातूनच पक्ष उभा केला असे नाही, तर राजकीय परिवर्तन घडवून आणले. राजकीय कार्यकर्त्यांना व्यंगचित्राची धास्ती वाटत असते. पुण्यामध्ये असलेल्या खड्डय़ांवर व्यंगचित्रांची मालिका प्रसिद्ध झाली आणि दहा वर्षांपूर्वी महापालिकेमध्ये सत्ता परिवर्तन झाले. अनेक व्यंगचित्रांनी समाजाला चांगल्या मार्गावर नेले आहे. समाजातील वेगवेगळे प्रश्न व्यंगचित्रांतून हाताळून व्यंगचित्रकारांनी राज्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे.
दीनानाथ दलाल, हरिश्चंद्र लचके, बाळासाहेब ठाकरे, वसंत सरवटे अशा व्यंगचित्रकारांनी केलेले काम पुढे नेण्याचे कार्य कार्टूनिस्ट कंबाइन करीत आहे, असे शि. द. फडणीस यांनी सांगितले. व्यंगचित्रकार हा समाज जागृतीचे महत्त्वाचे अंग आहे. समाजाची ठेवण, माणसांचं वागणं आणि संस्कार हे त्या त्या काळच्या व्यंगचित्रांतून व्यक्त होत गेले असल्याचे दिनकर थोपटे यांनी सांगितले. फक्त मनोरंजनच नव्हे, तर प्रबोधन करण्याची क्षमता व्यंगचित्रांकडे असल्याचे चारुहास पंडित यांनी सांगितले. प्रशांत कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून मराठी व्यंगचित्रांच्या इतिहासावर प्रकाश टाकला.