नाटय़समीक्षक-व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांची खंत
सांस्कृतिक पुणे हे एके काळी नाटकांसाठी प्रसिद्ध होते. नाटकांसाठी नाटय़गृहे आणि चित्र-शिल्प प्रदर्शनासाठी कलादालने असायला हवीत. सध्या नाटकांना तारीख न मिळणे हे दुर्दैवी असून त्याचा थेट संबंध राजकारणाशी आहे, अशी खंत ज्येष्ठ नाटय़समीक्षक-व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केली.
अनुबंध सेवा प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे कामगार दिनाचे औचित्य साधून तेंडुलकर यांच्या हस्ते पडद्यामागच्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते स्वरूपकुमार, ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, भरत नाटय़ मंदिराचे अध्यक्ष आनंद पानसे, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जाधव या वेळी उपस्थित होते. सदाशिव कांबळे (वेशभूषाकार), माधव थत्ते (रंगभूषाकार), बाळकृष्ण कलान (फलक लेखनिक), अरुण पोमण (प्रकाशयोजना), अभिजित इनामदार (संगीत ध्वनिसंयोजक), संदीप देशमुख (रंगमंच सजावट), शिविलग नागटिळक (वाहनचालक) शिरीष गोडबोले आणि सुनील मांडवकर (तिकिटविक्री संयोजक) कलकारांचा स्मृतिचिन्ह आणि मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.
तेंडुलकर म्हणाले, नाटकांसाठी तारखा मिळाव्यात याकरिता पक्षभेद विसरून सर्वानी एकत्र यायला हवे. राजकीय कार्यक्रमांसाठी रंगमंदिर आणि कलादालन दिले जाते. व्यवस्थापनाकडून पैसे परत दिले जातील असे सांगितले जाते. कलाकारांना मिळणारी अपमानास्पद वागणूक थांबायला हवी. पुणेकरांच्या करातून उभारलेल्या रंगमंदिर आणि कलादालनामध्ये कलाकार आणि रसिकांना प्राधान्य मिळायला हवे.
अशोक जाधव यांनी प्रास्ताविक केले. संजय डोळे यांनी सूत्रसंचालन केले.