ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचे मत

पुणे : आपल्याकडे शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा आहे. साहित्याची अभिरूची आणि नाटकाविषयीचे वेड आहे. त्या तुलनेत चित्रसाक्षरता फार असल्याचे दिसून येत नाही. आपल्याच कोशात असलेले चित्रकार आणि शिल्पकार त्याला बहुतांशी कारणीभूत आहेत. ‘आपण बरे आणि आपले काम बरे’ ही त्यामागची भूमिका असेल. पण, आपल्या सर्जनशील निर्मिती प्रक्रियेविषयी चित्रकारांनी बोलते आणि लिहिते झाले पाहिजे, असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

आपल्या रेषांच्या सामर्थ्यांने नकळत गालावर हसू उमटविणाऱ्या चित्रांची मालिका साकारणारे, ‘हसरी गॅलरी’, ‘मिश्कील गॅलरी’ आणि ‘फडणीस गॅलरी’ या पुस्तकांचे निर्माते शि. द. फडणीस सोमवारी (२९ जुलै) ९५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने ‘लोकसत्ता’शी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. चित्रसाक्षरता वाढविण्याच्या उद्देशातून मी सार्वजनिक कार्यक्रमांद्वारे रसिकांशी संवाद साधत असतो, असे त्यांनी सांगितले. माझ्या जुन्या व्यंगचित्रांचे जतन करण्याचे काम सध्या सुरू आहे. आता बैठक मारून चित्र काढणे जमत नसले तरी अधूनमधून आवर्जून रेषांचा रियाज सुरू ठवतो, असे त्यांनी सांगितले.

फडणीस म्हणाले, व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली १९८२-८३ मध्ये व्यंगचित्रकारांचे पहिले संमेलन झाले तेव्हा आम्ही जेततेम दहा-बारा कलाकार होतो. आता या कलेविषयी रसिकांमध्येही जागरुकता आली आहे. आता कार्टूनिस्ट कम्बाईन संस्थेचे व्यंगचित्रकार संमेलन होते तेव्हा किमान सव्वाशे-दीडशे चित्रकार सहभागी होतात. त्यामुळे या माध्यमाच्या सामर्थ्यांची जाणीव लोकांना होत आहे याचे समाधान वाटते. सृजनाला आव्हान देणारे व्यंगचित्र हे माध्यम मला चित्रकलेच्या वाटेवर भेटले. ललित साहित्य आणि दिवाळी अंकांची मुखपृष्ठे, तत्त्वज्ञानविषयक लेखन, शालेय पाठय़पुस्तके, बँकिंग, औषधे अशा विविध माध्यमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मात्र, अ‍ॅनिमेशन हे नवे माध्यम शिकण्याचे राहून गेले. एका जीवनात सगळीच स्वप्नं पूर्ण होत नाहीत. त्यामुळे राहिलेली स्वप्नं पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्यात आनंद असतो.

व्यंगचित्र म्हणजे केवळ मनोरंजन करणारे चित्र नाही. तर, या माध्यमाची ताकद विलक्षण आहे, असे सांगून फडणीस म्हणाले, रेषा हीच वैश्विक भाषा असल्यामुळे व्यंगचित्राला भाषा आणि देशाच्या सीमांचा अडसर नसतो. ‘शब्दविरहीत हास्यचित्र’चा मी जनक नाही. पण, चित्रातून आशय पोहोचत असेल तर शब्द वापरायचे कशाला? अशी माझी धारणा आहे. रेषांमुळे आर. के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे आणि वसंत सरवटे या समकालीन व्यंगचित्रकारांशी मैत्र जुळले. त्यांच्या कलेचा माझ्यावर प्रभाव आहे. पण, माझे चित्र हे माझेच असले पाहिजे हा कटाक्ष मी जाणीवपूर्वक ठेवला.