छळ केल्याप्रकरणी पती आणि नातेवाइकांविरुद्ध गुन्हा
जादूटोणा केल्याची बतावणी करुन महिलेचे दागिने आणि रोकड लंपास करणारा भोंदू आणि तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पती आणि त्याचे नातेवाइकांनी माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ केल्याची तक्रार तिने पोलिसांकडे दिली आहे.
याप्रकरणी महिलेचा पती रफीक आणि भोंदू वल्ली तार मोहंमद पटेल (रा.पातूर, जि.नंदूरबार) याच्यासह पाच जणांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका चाळीस वर्षीय महिलेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा घटस्फोट झाल्यानंतर तिने रफीक याच्यासोबत दुसरा विवाह केला होता. ती मूळची अकोला येथील रहिवासी आहे. विवाहानंतर तिचा पती आणि नातेवाइकांनी माहेरहून मोटार घेण्यासाठी पैसे आणण्याची मागणी केली. तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरु केला. दरम्यान, पती आणि त्याच्या नातेवाइकांनी तिला भूतबाधा झाली आहे, असा आरोप केला. त्यानंतर भोंदू पटेल याला पातूरहून पुण्यात बोलावून घेतले. तुला चेटकिणीने झपाटले आहे, असे पटेल याने सांगितले. महिलेला लिंबू, तांदूळ खाण्यास देऊन तिला मारहाण केली. महिलेच्या भावाने रफीक याला एक लाख रुपये दिले.
त्यानंतरही रफीक आणि त्याच्या नातेवाइकांनी महिलेचा छळ सुरु ठेवल्याने एप्रिल महिन्यात ती माहेरी निघून आली. महिलेचा सावत्र मुलगा माहेरी आला आणि त्याने पुन्हा तिला धमकावून पैसे मागितले. पती आणि त्याच्या नातेवाइकांच्या धमक्यांना कंटाळलेल्या महिलेने अखेर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक जगदीश राऊत तपास करत आहेत. वाकड परिसरात एका भोंदूने महिलेची फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी (२० मे) घडली होती. याप्रकरणी त्या भोंदूला अटक करण्यात आली आहे.